पान:कविता गजाआडच्या.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. एकीकडे आत्मा हा निराकार , निर्गुण ,निर्लेप आहे असे म्हणायचे आणि मरणानंतरही देहाभोवतीच सगळे सोपस्कार करायचे या विरोधाचे अत्यंत आर्त आणि तरीही उपरोधपूर्ण वर्णन कवयित्री 'दोन सवाल' (कै. अनामिकेचे) मधून करते.

"आत्मा चालला उपासी।
दूर दूरच्या गावाले |
माय मातीच्या कानात ।
दोन सवाल पुशीले ॥"

 निर्गुणी, निराकार, द्वंदातीत असे वर्णन केलेला आत्मा मुक्त झाला खरे तर तो स्त्री-पुरुष यांच्या आतीत-पलीकडे गेला. अशावेळी

"कुन्या जातीचा पालव
आता डुईवर सांग?"

 हा पहिला सवाल आणि दुसरां सवाल

"कुंकवाचं देनं-घेन ।
काया मन्याचा वायदा
परदेसी पराईण
तिले कोनाचा कायदा ?"


 मृत्युनंतरही स्त्रीला पुरुषसापेक्षतेशी बांधून ठेवणाऱ्या दुनियेचे कायदे बदलण्यासाठी आपल्या सर्व मर्यादांच्या गजाबाहेर झेपवू पाहणाऱ्या स्त्रीमनाची अभिव्यक्ती करणाऱ्या या 'कविता गजाआडच्या ' एका चळवळीतून आलेलल्या नवभानाचा आविष्कार आहे. एक परीने स्त्री चळवळीतून घडलेल्या संवेदनशील कविमनाचा हा प्रातिनिधिक आविष्कार आहे आणि तरीही शैलाताईंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे लेणे घेऊन आलेला आहे.
 त्यांच्या या कवितेच्या पुस्तकरूपाने होणाऱ्या आविष्काराला माझ्या चार अक्षरांचा टेकू आवश्यक नव्हता- पण सईच्या प्रेमळ आग्रहाला डावलता आले नाही. तिच्या कवितेला आणि तिला उदंड शुभेच्छा हेच या चार अक्षरांचं खरं उद्दिष्ट.

डॉ.तारा भवाळकर