चैतन्यांतून चैतन्य प्रकटतें, तेजांतून तेजःप्रसव होतो; चैतन्यचालनेशिवाय, चित्प्रेरणेशिवाय काय मिळणार?
चित्रकार राष्ट्रीय कसा व्हावयाचा? चित्रकार हा राष्ट्रीयतेचा चित्रकार, राष्ट्रीय आकांक्षा रंगवणारा चित्रकार कसा होणार? हें शक्य आहे का मनुष्याला? अमूर्त कल्पनेला मूर्त करतां येते की नाही, तिला पोषाख देतां येतो की नाही, तिला आकार देतां येतो की नाही, त्या आकारांत रक्त, मांस, प्राण ओततां येतात की नाही? अमूर्त भावना रंगवतां येते की नाही ? निसंशय येते. जर आपणांस कधीं शंका असेल, तर अवनींद्रनाथ टागोरांच्या भारतमातेच्या अनुपम सुंदर चित्राने ती शंका केव्हाच निरसन झाली असेल; परंतु हें सारें चुटकीसरसें होणार नाही. कलावानाच्या मनाची उत्कृष्ट परिणति व विकास झाल्याशिवाय अमूर्ताला मूर्त करण्याची ही सिद्धि प्राप्त होणार नाही. नवशिक्याला तर हें अशक्य आहे. पहिल्या पायरीवर ज्याचा पाय आहे, त्याला मूर्ति-दर्शन, मूर्ति-भेट कशी होणार ? त्याने या शक्तीकडे कसें जावयाचें? कसा मार्ग आक्रमावयाचा? अशा प्रकारचे आदर्श व थोर आकार, थोर विचारांना थोर मूर्त रूप देण्याची ही शक्ति, ती त्याला हळूहळू पण निश्चितपणें कशी मिळत जाणार? कसें त्याने पुढेपुढे जावें?
पहिली गोष्ट ही की, आपल्या दृष्टीने आपणांस जो आनंद होतो, त्याच्याशीं कलेचा संबंध आहे. कला ही दृष्टिद्वारा आनंद-वितरण करते; कलेचा हेतु, उद्देश आनंद-दान हा आहे. झान-दान हा नाहीं. तो मूख्य उद्देश नाहीं. जें चित्र केवळ ज्ञान देतें, तें चित्र नसून ती एक भूमितीतील, आकृति असेल, सृष्टिशास्त्रांतील, रसायनशास्त्रांतील कांहीं यंत्राकृति असेल.
पान:कला आणि इतर निबंध.pdf/४०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कलेचा संदेश
३७