Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



निबंध दुसरा :

कलेचा संदेश


 भारतांतील कला आध्यात्मिक संदेश सांगणारी आज आहे; आजची उदयोन्मुख भारतीय कला राष्ट्रयितेच्या भावनेनें भारून गेलेली आहे. हा जर संदेश प्रत्यक्ष प्रकट करावयाचा असेल, बोलून दाखवावयाचा असेल, तर चित्रकाराला कला पोटाचे एक साधन म्हणून अतःपर मानून चालणार नाही; पोट भरावयाचा भाकरीचा धंदा म्हणून कलेकडे पाहण्याचें सोडून दिलें पाहिजे; तर कला म्हणजे शिक्षणाचें, परमोच्च, शिक्षणाचें परमोच्च साधन या दृष्टिने त्याने कलेकडे पाहिलें पाहिजे. म्हणून आज भारतांतील कलाशाळा विद्यापीठ झाली पाहिजे. कलेचा अभ्यास करणाऱ्यांच्या समोर देशांतील राष्ट्रांतील सर्व महत्वाचें प्रश्न उभे असले पाहिजेत. त्यांनी या गोष्टींच्या अभ्यासाव्यतिरिक्त वेळांत चर्चा केल्या पाहिजेत; राष्ट्रीय झगड्याशीं, राष्ट्रीय आकांक्षांशी आपलें जीवन एकरूप केलें पाहिजे. विद्यार्थ्यांमधील बोलणें चालणें याच गोष्टींचें चाललें पाहिजे. जगांतील सारीं गूढ रहस्यें जाणण्याच्या इच्छेनें, प्रेरणेनें त्यांचें वाचन सुरू झालें पाहिजे. उदात्ततेकडे जाण्यासाठी कलोपासकांनी वेडें झालें पाहिजे.