Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
कला आणि इतर निबंध
 

कशासाठी झगडायाचे आहे आहे? वर जाण्याचा जेथें झगडा नाही, जेथे उत्तरोत्तर उन्नति, प्रगति करून घेण्याची धडपड नाहीं, तेथे अपूर्व प्रतिभा नाहीं. थोर कला नाहीं, थोर काव्य नाहीं! म्हणून साम्राज्याच्या काळांत कलेचा अधःपात होतो. साम्राज्ये वाढू लागतांच कला क्षीण होते; परंतु आज भारताची स्थिति इंग्लंडच्या उलट आहे. आज आपणांस प्रत्येक गोष्टीसाठी झगडावयाचें आहे. आपला विचार स्पष्ट व निश्चित करण्यासाठी आपणांस धडपडावयाचें आहे; तो स्पष्ट विचार सर्व हिंदुस्थानभर फैलावण्यासाठी सर्व हृदयांत तो विचार स्फुलिंग पेटवण्यासाठीं, ती विचार-विद्युत् पसरवण्यासाठीं, आपणांस धडपडावयाचे आहे; व अशा रीतीने सर्वांनी एका मताचें, एका दिलाचें व्हावयाचें आहे; हें झालें, म्हणजे ही आपली एकता स्वतःला व दुसऱ्याला पटवून देण्यासाठी, दुसऱ्यांच्या प्रत्ययास तिची यथार्थता आणून देण्यासाठीहि मग झगडावयाचे आहे! भारतांत संघर्ष आहे. झगडा आहे, धडपड आहे. म्हणूनच येथे ठिणगी पडेल, अग्नि पेटेल, दिवा लागेल; म्हणूनच येथे काव्य प्रकट होईल व कला उत्कृष्ट थोर कला निर्माण होईल.