Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
कला आणि इतर निबंध
 

मग हें चित्र भारतीयाला जास्त प्रिय वाटेल कीं वरचें पाश्चिमात्य मायलेकरांचें?
 जयपूरच्या म्यूझियमच्या भिंतीवरील चित्रे कोणीहि चितारलेलीं असोत; या चिताऱ्यास प्राचीन भारतीय चित्रकलेचा आत्मा भेटलेला होता, त्याला प्राचीन भारतीय चित्रकलेतील महत्त्व व श्रेष्ठत्व कशांत आहे, हें कळलेलें होतें. या प्राचीन कलेचा भविष्यकाळ कसा उज्ज्वल व महनीय होईल, याची दिशाहि जणुं त्याला दिसली होती. एका जुन्या चित्रयुक्त महाभारताच्या प्राचीन हस्तलिखितांतील चित्रांचें वाढवून काढलेलें एक चित्र तेथील भिंतीवर आहे. मुळांतील तें चित्र शंभरपटीनें मोठें करून काढलें आहे. युधिष्ठिराचें द्यूत खेळण्याचें तें चित्र आहे. नारिंगी व सोनेरी रंगाची झळक त्यांत आहे; नाना आकृति, नाना मूर्ति, नाना हावभाव, नाना विकार-विचार त्यांच्या मुखांवर आहेत. ते चित्र जणु जिवंत वाटतें. कोणाचें तोंड पुढें होत आहे, कोणाचे हात प्रत्येक जण जणुं कांहीं तरी करीत आहे; अद्भुत सौंदर्यपूर्ण हें चित्र आहे. कोणाही अर्वाचीन चित्रकाराला, इतक्या सहज न कळत अशी हृदयप्रकटता साधली नसती, असे हृदयदर्शन, भावदर्शन करतां आलें नसतें. इतक्या लहानशा जागेंत इतकें जीवन, इतके नमुने तेथें दाखविले गेले आहेत कीं, असें कौशल्य अशा लहान जागीं अपार सृष्टि दाखवणारा, बिंदूंत सिंधू ओतणारा, मुखांत विश्वरूप दाखवणारा असा कुशल चित्रकार अर्वाचीन काळांत झाला नाहीं. भारतीय चित्रकलेचें हे महनीय व उदात्त विशेष ही भावप्रकटता थोडेसें अल्प मिळवण्यांच्या नादी लागून आपण गमावून बसूं नये. कणभर मिळवू पण मणभर गमावूं व मग उपाशी मरूं!