Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दीपाबाई
 


केकाटत असली, तर हिचें विशेष लक्ष त्यांजकडे जाई. बाकीचीं इतकीं माणसें या सगळ्या चौकशा करावयास असतांना या लहान पोरीनें त्यांत मन घालावें, या गोष्टीचें आईबापांना मोठें नवल वाटे; पण याच नवलांतून पुढें मोठें जगप्रसिद्ध नवल उत्पन्न झालें.
 फ्लोरेन्स सतरा वर्षांची झाली, तेव्हां सरासरी मानानें तिचें शिक्षण संपलें, असें म्हणावयास हरकत नाहीं. मुली वयांत आल्यानंतर त्यांनी करावयाच्या म्हणून कांहीं गोष्टी असतातच. त्यांतहि ही थोर घराण्यांतील आणि खानदानीच्या सरदारी थाटांतील मुलगी. अर्थात् तेव्हांच्या चालीप्रमाणे तिचा वर्तनक्रम चालू झाला. 'छोट्या बाईसाहेब' म्हणून तिला नोकरचाकर संबोधूं लागले. त्यांनी आज्ञा केली असतां ती मानली पाहिजे, व त्यांच्या मर्जीचा कल पाहून वागले पाहिजे, हें सेवकांच्या ध्यानांत येऊन चुकलें. आपल्या गांवांतील लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, कोणी अनाश्रित माणूस कोठें आजारी होऊन पडलेलें आहे कीं काय, लोकांना बायबल शिकण्याची व्यवस्था आहे कीं नाहीं, अशांसारखी सार्वजनिक स्वरूपाचीं कामेंहि सरदार लोकांच्या वयांत आलेल्या मुलींना करावीं लागत. फ्लोरेन्स हिचा स्वाभाविक कलच तसा असल्यामुळे, तिनें हीं कामें फार हौसेने चालू केलीं. अनाश्रितांना आश्रय देणें, दुःखितांचें दुःख नाहींसें करणें आणि 'ज्यासि आपंगिता नाहीं त्यासि हृदयीं धरणें' हा तिचा मनोधर्म होता. आणि म्हणून हीं तिचीं कामेंहि चांगली होऊं लागलीं. तथापि तिच्या मनाची हुरहूर आणि अस्वस्थता वाढतच चालली. तिला वाटे कीं, आपण करतों हा सगळा पोरखेळ आहे. दुःख पर्वताएवढें आहे, पण आपले दुःख निवारणाचे यत्न जवापाडे आहेत. हें तिला जास्त जास्त पटू लागले व बोंचूं लागलें; आणि जीवितांतील सुखोपभोगांची व ऐषआरामांची तिला लाज वाटू लागली.
 सुखी घराण्यांतील मुलींची दिनचर्या म्हणजे ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर अशी असावयाची. सकाळच्या प्रहरीं नोकर-चाकर आपापल्या उद्योगास लागले कीं नाहीं, हें पाहावयाचें, मग टेबलांवर, फुलपात्रांत, किंवा खिडक्यांवर पुष्पगुच्छ किंवा फुलमाळा लावावयाच्या; मग कांहीं वेळ हातीं रंग घेऊन थोडी रंगवल्ली म्हणजे रांगोळी काढावयाची; कांहीं वेळाने मग कशिदा काढावयास बसावयाचें; किंवा धाकट्या भावाला गळपट्टा विणून द्यावयाचा; जेवणारी पाहुणे मंडळी कोण आली न आली, हें पाहून त्यांना 'या बसा' करावयाचें;