Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिच्या सांवलीलाही ते सलाम करीत


दीपाबाई : १ :

 'फ्लोरेन्स नाइटिंगेल' या थोर स्त्रीचा जन्म इ. स. १८२० साली इटली देशांत फ्लोरेन्स येथे झाला. नाइटिंगेल हें घराणें इंग्लंडचें; परंतु मंडळी घरची सुखवस्तु असल्यामुळे तिकडील पद्धतीप्रमाणे फ्लोरेन्सचे आईबाप निरनिराळ्या देशांत प्रवाससुखाचा अनुभव घेत असतां, फ्लोरेन्सच्या जन्माच्या वेळीं त्यांचा मुक्काम फ्लोरेन्स गांवीं होता. या गांवीं तिचा जन्म झाला, म्हणून आईबापांनीं गंमतीनें तिचें नांव 'फ्लोरेन्स' असेंच ठेवलें. वास्तविक पाहतां, फ्लोरेन्स हें नांव बायकांना ठेवीत नाहींत; पुरुषांना ठेवतात. परंतु या एका गंमतीच्या जोडीला दुसरी गंमत म्हणून वडिलांनी मुलीचेंहि नांव फ्लोरेन्स असे ठेवलें. फ्लोरेन्सला एक वर्षाने मोठी वडील बहीण होती. तीहि अशीच प्रवासांत झालेली होती; व तिचें नांव 'पार्थिनोप्' असें होतें. या दोघींना 'पॉप' आणि 'फ्लो' अशीं लाडकी नांवें मिळालेली होती. परदेशांत जन्मलेल्या या दोन सुंदर मुलींना बरोबर घेऊन आईबाप इंग्लंड देशांत परत आले.
 नाइटिंगेल मंडळी नुसती सुखवस्तुच नव्हती. समाजांत आणि राजकीय उलाढालींत सुद्धां त्यांच्या शब्दाला विशेष प्रकारचा मान असे. इंग्लंडमधल्या मोठमोठ्या खानदानीच्या घराण्यांशीं त्यांचे शरीर संबंध झालेले असून खुद्द राजघराण्याला आपलीशी वाटण्यासारखीं जीं कांहीं कुळें होतीं, त्यांतहि त्यांचा अंतर्भाव होत असे. डर्बी-शायरमध्यें 'लीहर्स्ट' या नांवाचा त्यांचा एक सुंदर वाडा होता. तेथें उन्हाळ्यांच्या दिवसांत ही मंडळी राहत असत; आणि हिंवाळा आला, म्हणजे 'एमले' नांवाचा दुसरा एक राजवाडा दक्षिणेकडे असे, तेथें जाऊन राहत असत. त्या दिवसांत आगगाड्या निघालेल्या नव्हत्या. या गांवाहून त्या गांवाला जावयाचें, म्हणजे भाड्याच्या धमन्या असत. पण जे घरचे श्रीमंत, ते आपली स्वतःची धमनी ठेवीत. नाइटिंगेलच्या घरीं चौचाकी गाडी असून तिला चार घोडे जुंपीत असत. सडका बनत बनत बनलेल्या असल्यामुळे, प्रवासहि आतांच्या