Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रा स्ता वि क



 अकरा कर्तबगार स्त्रियांचीं चरित्रे पुढील थोड्याशा पानांत दिली आहेत. त्यापैकीं प्रत्येक स्त्रीनें मानवी जीवनाच्या विकासांत एका एका टप्प्याची भर घातली आहे. मानवी जीवन असावें तितकें न्यायाचें नाहीं व सुखाचें नाहीं; आणि म्हणून हा न्याय व हें सुख ह्या जीवनाला मिळवून देण्यासाठी आपण झगडलें पाहिजे आणि देह कष्टविला पाहिजे, हें बहुतेक साऱ्याच स्त्रियांच्या कर्तबगारीचें क्षेत्र बनलें होतें, असें दिसेल; आणि एका स्त्रीनें तर भौतिक शास्त्रांच्या शोधांत येवढें उड्डाण केलें, कीं त्या शोधाच्या तेजानें जगाचे डोळे दिपूनच गेले. मानवी जीवनाला न्याय व सुख मिळवून देतांना या स्त्रियांना नातेवाइकांशीं, सरकारशीं आणि एकंदर पुरुष जातीशीं मोठ्या तडफेनें झगडावे लागले. ज्या ज्या देशाला व समाजाला हा न्याय व हें सुख हवे असेल, त्या त्या देशांतील व समाजांतील तरुण स्त्रियांनीं या लहानशा पुस्तकांतील स्त्रियांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवणे अत्यंत इष्ट आहे; आणि जर पुरुषाची जात आतां खरोखरच स्त्रियांची पक्षपाती बनली असेल, तर तिनेंही या कामी झगडलें पाहिजे. प्रत्येक चरित्रांतील प्रयत्नाचें दर्शन इतकें स्पष्ट आहे, कीं प्रस्तावनेत त्या संबंधाने जास्त कांहीं लिहिण्याची आवश्यकता नाहीं.

श्रीपाद महादेव माटे.