Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
कर्तबगार स्त्रिया
 


मिळालेली आहे, म्हणून तो दुप्पट जोरानें कामास लागला. पण येवढ्यानेंच झालें नाहीं. अमेरिकेत मिळालेल्या शिक्षणाने आणि ख्रिस्ती धर्माच्या आचारानें मेलिंग हिच्या मनाला जो एक स्वतंत्रतेचा बोध झालेला होता, तो आतां चँगच्या कानी पडला. रोज सकाळीं ती नवऱ्याबरोबर फिरावयास जाई आणि त्याला खिस्ती पुराणांतील गोष्टी सांगे. होतां होतां खिस्ती धर्मतत्त्व पटले म्हणून म्हणा, किंवा बायकोचा शब्द मोडवेना म्हणून म्हणा, चँग-कै-शेक दोन वर्षांनीं खिस्ती बनला. अशा रीतीनें मेलिंग आणि चँग यांचा पूर्ण मिलाफ होऊन गेला.
 नवऱ्याबरोबर प्रत्यक्ष रणांगणावर जाणें आणि सर्व देशभर सैन्याची नाचानाच करणें हें मेंलिंग हिला अर्थातच अशक्य होतें. परंतु, जो नवा चीन देश चँगच्या मनांत जन्मास घालावयाचा होता, त्याचे स्वरूप सिद्ध करण्यासाठीं, इतर अनेक चळवळींची आवश्यकता होती. ही आवश्यकता ओळखून मेलिंग कामाला लागली; आणि मग एकाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे, तिनें आपल्या अंगातल्या सर्व शक्ती प्रकट केल्या. जे क्रान्तिकारक रणांगणावर पतन पावले होते, त्यांच्या मुलांच्यासाठीं तिनें शाळा काढल्या. ती म्हणे कीं, 'हींच मुले पुढे देशासाठीं अधिक त्वेषानें लढतील. कारण आपला बाप कशासाठीं मेला, याचें स्मरण त्यांना होईलच होईल.' या शाळांत तिनें शिक्षणाची एक नवीनच प्रथा पाडली. कांहीं हस्तव्यवसाय करावा, शारीरिक श्रम करावे, आणि या व्यवसायाचा आणि श्रमांच्या द्वारां ज्ञान संपादन करावें, असा शिक्षणाचा क्रम तिनें चालू केला. नेहमींच्या शाळांतून, 'असें करावें; तसें करूं नये,' असें सांगण्यांत येतें. पण असें कां करावें, आणि तसें कां करूं नये,' हें मात्र कधीं सांगत नसत. मेलिंग हिने शिक्षणाची तऱ्हा अशी ठेवली कीं, कां किंवा कशासाठीं असे प्रतिप्रश्न विचारण्याची बुद्धि विद्यार्थ्यांना व्हावी; आणि जमल्यास, त्यांची त्यांना उत्तरे द्यावीं.
 बाहेर शिक्षणाचा असा उपक्रम चालू असतांना, घरांत तिनें चँग-कै-शेकला पाश्चिमात्य लोकांचे ध्येयवाद आणि त्यांचे राजकीय तत्वज्ञान यांचे शिक्षण दिलें. थॉमस जेफरसन् याचें राजकीय तत्वज्ञान आणि अब्राहम लिंकन याचा समाज विचारांतील गूढवाद तिनें आपल्या नवऱ्याच्या मनावर चांगला बिंबवला. परंतु रणांगणाची हवा तिने मुळींच पाहिली नाहीं, असें मात्र नव्हें. नवऱ्याची साहसवृत्ति आणि त्याचा कामाचा धडाका पाहिल्यावर, यांच्या हालविपत्तींत आपण सहभागी झालें पाहिजे, अशी बुद्धि तिला होई; आणि मग, तो जेथें कोठें जाई, तेथें