Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम चँग-कै-शेक
१७
 


अमेरिकेंत पाठवून दिलें होतें. स्वाभाविकपणेंच, चिनी भाषा, चिनी संस्कृति यांचा गंधहि या मुलींच्या ठिकाणीं नव्हता.
 मेलिंग सुंदर इंग्रजी बोले; बायबलांतील संदर्भ तिच्या भाषणांत येत; आणि धर्मातील तत्त्वांचे मर्महि ती समजावून सांगे. मुख्यतः ख्रिस्ती धर्मातील भूतदयेचे तत्त्व तिला फारच पटलेलें होतें. जे कोणी रंजले-गांजले असतील, त्यांना आपले म्हणावें, अशी तिच्या मनाची ठेवणच बनून गेली होती. चिनी संस्कृति आणि चिनी जीवन यांची पुरेशी माहिती तिला झालेली नव्हती. म्हणून स्वदेशीं परत जातांना ती एकदां म्हणाली, 'मी चीन देशांतील खरी; पण नाक-डोळे सोडून दिले, तर माझ्या ठिकाणी चिनीपणाचे कोणचें लक्षण राहिलें आहें?' मेलिंगचे हें म्हणणें अगदीं बरोबर होतें.
 सूंगच्या ठिकाणी कितीही प्रखर देशभिमान असला, तरी जीवनांत आधुनिकता आणल्याशिवाय, देशाची प्रगति कधीही व्हावयाची नाहीं, हें त्याला कळून चुकलेलें होतें. आणि म्हणूनच त्यानें आपल्या मुलींना येवढ्या लहान वयांत परद्वीपांत शिक्षणासाठी धाडलेलें होतें. मेलिंगच्या ठिकाणीं सुद्धां स्वदेशाचा मोठा ओढा होताच; पण आधुनिक कल्पनांचा प्रसार स्वदेशांत झपाट्यानें केल्याशिवाय तेथील लोकांचे खरें ऊर्जित साधवयाचे नाहीं, ही तिची पक्की खात्री झाली होती.
 चीन देशांत आल्यावर तर 'हें चित्र पहा आणि तें चित्र पहा' हाच प्रश्न तिच्या मनापुढे सारखा येऊं लागला. अमेरिकेतील स्वच्छतेचें स्मरण झालें, म्हणजे स्वदेशांत पसरलेल्या घाणीची तिला लाज वाटे. अमेरिकेतील आरोग्य तिने पाहिलेलेंच होतें. त्या मानानें पाहतां, आपले चिनी बांधव केवळ रोगग्रस्त आहेत, असेंच तिला वाटू लागले. अमेरिकेतील सर्वच माणसें भर पोटीं काम करतात, कोणाला अन्नाची ददात नाहीं, हें तिनें पाहिलेलें होतें येथें स्वदेशांत बघावें, तर जिकडे तिकडे बेकारी आणि उपासमार माजलेली तिला दिसूं लागली. जर स्वदेशाची सेवा करावयाची, तर घाण, रोगराई, आणि उपासमार यांचा नायनाट कसा होईल हें पाहावयाचें, असें या पोरीने ठरविलें.
 दरम्यान चीन देशांत एक मोठी चमत्कारिक घटना घडून आली होती. सन्यत्सेन यानें मांचू घराणें उलथून पाडलें होतें, व लोकशाही प्रथापित केली होती, हें खरें; तरी, राजशाहीच्या अभिमानी लोकांचा बीमोड अजून झालेला नव्हता; आणि लोकशाहीचा अभिमान पुरेसा प्रखर बनला नव्हता. राजकुलाच्या अभिमानी