Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
कर्तबगार स्त्रिया
 


 जनरल कार यानें हें काम खुषीनें हातीं घेतलें. पण या चिनी मुलाच्या मनाची घडण कांहीं निराळीच झालेली होती. घरच्या थाटावरून सूंगच्या ध्यानांत आलें कीं, जनरल कार ही मोठी श्रीमंत आसामी असली पाहिजे. त्याला हेंहि दिसून आले कीं, उपाध्येबुवांची छाप जनरल कारवर मोठीच आहे. आणि म्हणून तो आपले शिक्षण चांगल्या प्रकारें करील. पण या श्रीमंत घरी फुकट खात बसावें, आणि त्याच्या पैशावर कॉलेजचा खर्च चालवावा, ही गोष्ट त्याला पसंत पडेना. जनरल कार नको नको म्हणत असतांना, पुस्तकें विकण्याचा एक स्वतंत्र धंदा त्यानें चालू केला; आणि त्यांतून तो आपला शिक्षणाचा खर्च भागवूं लागला. पुस्तकांचा बोजा पाठीवर घ्यावा, आणि दारोदार हिंडून गिऱ्हाईक गांठावें, असें सुद्धां त्यानें केलें. सुताचे टांगते झोपाळेहि त्याला विणतां येत असत. हे विकूनहि, तो आपल्या आद्यांत भर घालू लागला.
 असें दिसतें कीं, शिक्षणाचे काम यथातथाच झालें. पण चिनी प्रकृतीला मानवणारा व्यापार मात्र त्यानें चांगला चालू केला. शेवटीं, स्वदेशांत जावें, आणि मोठा व्यापार-धंदा सुरू करावा, असें त्याच्या मनानें घेतलें. आणि हा ख्रिस्ती झालेला तरणा मुलगा थोडासा प्रौढ होऊन स्वदेशाला परत आला.
 एवढ्या काळांत त्याला अमेरिकन बाजारपेठांची माहिती चांगली झालेली होती. म्हणून अमेरिकेतील व्यापाऱ्यांशीं बोलणें चालणें करून त्यानें शांघाय येथें अमेरिकन यंत्रसामुग्रीचे एक मोठें दुकान काढलें; आणि थोड्याच दिवसांत तो चांगला गबर बनला.
 पुढें याच्या मुलींनी मोठमोठ्या लोकांशी लग्ने केली. पण केवळ श्रीमंत बापाच्या मुली म्हणून त्यांना हीं स्थळें मिळाली असें नव्हे. सूंग यानें त्यांना उत्तम शिक्षण दिलेलें होतें. चीन देश मागासलेला, आणि सूंग स्वतः ख्रिस्ती झालेला; म्हणून त्यानें आपल्या तीनहि मुलींना शिक्षणासाठीं अमेरिकेंत पाठवून दिलें.
 मे-लींग हिचे शिक्षण जॉर्जिया संस्थानांतील वेस्लेयन् कॉलेजांत झालें. परंतु, तिला पदवी मिळाली, ती मॅसॅच्युसेटस् संस्थानांतील वेलस्ले कॉलेजांतून. पदवी मिळाली, तेव्हां मे-लींग हिचे वय अवघें एकोणीस वर्षांचें होतें. बाप ख्रिस्ती; तेव्हां मुलीहि अर्थातच ख्रिस्ती झाल्या; आणि अमेरिकेत आधुनिक विद्येचा झालेला प्रकर्ष सूंग यार्ने पाहिलेला असल्यामुळे, फार लहानपणींच त्यानें या पोरींना