पान:करुणादेवी.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हार घातले. मंगल वाद्ये वाजत होती. मिरवणूक निघाली. किती तरी वर्षांनी शिरीष आपल्या जुन्या घरी आला. लोक आता आपापल्या घरी गेले. शिरीषने प्रेमानंदाला मिठी मारली.

 “ शिरीष, किती वर्षानी भेटलास !”

 “ परंतु तू माझ्या हृदयात होतास. जेवताना एक घास तुझ्या नावाने मी घेत असे."

 शिरीषने हेमाला मळा, बाग सारे दाखविले आणि तिघे पूजापात्रे हाती घेऊन समाधींच्या दर्शनार्थ गेली. शिरीषने साष्टांग नमस्कार घातला. तो रडत होता. भूमातेवर अश्रूचा अभिषेक झाला. तो उठेना. तसाच दंडवत् पडून राहिला.

 “शिरीष, ऊठ आता. अश्रुंनी खळमळ धुऊन जाते ऊठ राजा !” करुणा म्हणाली.

 हेमाने त्याला उठविले. तिघे हात जोडून उभी होती. शिरीष म्हणाला “ आई, बाबा, क्षमा करा हो.”

 “ क्षमा ! ' आकाशवाणी झाली."

 तिघे परत आली. शिरीषने गावाला मिष्टान्नाचे भोजन दिले. त्याने कोणाला ददात ठेवली नाही. कोणाला घर बांधून दिले. कोणाला जमीन दिली. कोणाचे कर्ज फेडले.

 “ माझ्या जन्मभूमीत कोणी दुःखी नको !” तो म्हणाला.

 एके दिवशी हेमा, करुणा, प्रेमानंद व शिरीष अशी बसली होती.

 “ प्रेमानंद, मी सर्वांना काही तरी दिले. तुला काय देऊ?” शिरीषने विचारले

 “शिरीष, तू का निराळा आहेस ? तुझे ते माझेच आहे. तू मला प्रेम दिले आहेस. तू रोज आठवणपूर्वक एक घास मला देत होतास, त्यात सारे त्रिभुवन आले."

 एके दिवशी ती तिघे जायला निघाली. प्रधानाला फार दिवस दूर कसे राहाता घेईल ! सारा गाव पोचवीत आला, बोळवीत आला. प्रेमानंद साश्रू व सगद्गद असा उभा होता. रथ गेला. गावकरी स्तुतिस्तोत्रे गात

७४ * करुणा देवी