पान:करुणादेवी.djvu/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दरवर्षी आपल्या विवाहाचा वाढदिवस शिरीष व करुणा साजरा करीत. वसंत ऋतूंत त्यांचे लग्न झाले होते. वाढदिवस वसंत ऋतूत येई. सारी सृष्टी त्या वेळेस सुंदर असे. वृक्षवेलींना नवीन पल्लव फुटलेले असत. झाडांना मोहोर असे. पक्षी गोड गाणी गोत असत. प्रसन्न वारा वाहात असे. आणि अशा प्रसन्न वातावरणात हा विवाह-वाढदिवस साजरा होत असे.

 अद्याप त्यांना मूलबाळ झाले नव्हते. सुखदेव व सावित्री ह्यांना नातवाचे तोंड कधी दिसेल असे झाले होते.

 “बाबा, तुम्हाला मी म्हातारपणी झाली तसे आम्हालाही म्हातारपणी मूल होईल !” हसून शिरीष म्हणे.

 “ परंतु त्या वेळेस आम्ही जिवंत नसू.”

 “ सोमेश्वराच्या यात्रेत बाळाला घेऊन आम्ही येऊ. तेथे तुमचे आत्मे बाळाला पाहातील.”

 “ सोमेश्वराला मला कधीही जाता आले नाही. किती तरी लांब. तू तरी कसा जाशील ?"

 “ इच्छा असली म्हणजे जाता येईल !” असे संवाद चालत.

  परंतु यशोधर राजाच्या नवीन आज्ञेची राज्यात सर्वत्र दवंडी देण्यात आली. सर्व बुद्धिमान तरुणांची यादी करण्याचे ठरले. आईबाप आपापल्या हुशार मुलांची नावे आनंदाने देऊ लागले.

 “ सुखदेव, तुमच्या शिरीषचे नाव दिलेत की नाही ? त्याच्यासारखा हुशार कोण आहे ? त्याच्यासारखा गुणी कोण आहे ? सवं राज्यात तो पहिला येईल. राजाचा मुख्य प्रधान होईल. तुमच्या भाग्याला मग काय तोटा ?"

 “ नको ते भाग्य. शिरीषचा वियोग मला क्षणभरही सहन होत नाही. मुक्तापूर राजधानी किती दूर. तेथे जायचे. वर्षभर शिकायचे. मग परीक्षा. नकोच ते. एक क्षणही शिरीष जवळ नसेल, तर मी कावराबावरा होतो. मग वर्षभर त्याच्याशिवाय कसा राहू? नको ते प्रधानपद. हे लहानसे घर, ही छोटीशी बाग, हा लहान मळा पुरे. मी नाही शिरीषचे नाव देणार."

शिरीष * ११