पान:करुणादेवी.djvu/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शिरीषने एकदम उडी घेतली. त्याने ते मूल वाचविले. उदार, प्रेमळ. शूर, बुद्धिमान असा हा आदर्श तरुण होता.

 त्याचे आता लग्न झाले. एका पोरक्या मुलीबरोबर लग्न. त्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. ती गरीब होती. चुलत्याकडे ती होती.

 “ तुझे लग्न कसे होणार? कोण तुला करणार? मी गरीब, कोठे तुला देऊ ?” चुलता एके दिवशी तिला म्हणाला.

 “ शिरीष लावील माझ्याबरोबर लग्न. त्याला गरिबांची काळजी. अनाथ मुलीचे. नशीब तो फुलवील.” ती म्हणाली.

 “वेडी आहेस तू. असा सुंदर नवरा मिळायला साता जन्माची पुण्याई हवी."

 “ मी का पापी आहे ?”

 “ पापी नसतीस तर पोरकी कशाला होतीस ?”

  “ ईश्वरावर ज्याची श्रद्धा आहे तो कधी पोरका होत नाही. जगातले आईबाप गेले तरी तो मायबाप सदैव आहेच.”

 “ करुणे, तुझे बोलणे थोरामोठ्यांसही लाजवील.”

 करुणा त्या मुलीचे नाव. किती गोड नाव. खरोखरीच ती मूर्तिमंत करुणा होती. ती गायीगुरांना मारीत नसे. पाखरास दाणे टाकील, मांजरास दहीभात घालील. करुणा सर्वांची करुणा करी. परंतु तिची करुणा कोण करणार? तिची दया कोणाला येणार? नाही का तिचे लग्न होणार? नाही का कोणी योग्य वर मिळणार? नाही का शिरीष मिळणार? करुणेचे चुलत्याजवळचे बोलणे सर्वत्र पसरले. शिरीषच्याही ते कानावर आले आणि खरेच त्याने करुणेशी लग्न लावले. सुखदेव व सावित्री ह्यांना वाटत होते, की एखाद्या श्रीमंताची मुलगी आपल्या मुलाला मिळावी. परंतु मुलाच्या इच्छेविरुद्ध ती गेली नाहीत.

 शिरीष व करुणा परस्परांस अनुरूप होती. त्यांच्या लहानशा संसारात आता आनंदाला तोटा नव्हता शिरीषबरोबर करुणाही शेतात काम करी. फुलांना पाणी घाली. ती पहाटे उठे. गोड गोड ओव्या म्हणत जात्यावर दळी. सासूसासच्यांची ती सेवा करी. त्यांची धुणी धुवी. त्यांचे पाय चेपी. गोड बोलून पतीलाही सुखवी, हसवी.

१० * करुणा देवी