पान:करुणादेवी.djvu/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


तुम्ही मला प्रिय आहात. कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे. त्याने "हया केसात शिरीष फूलच जाताना खोवले होते.”

 एके दिवशी रात्री एकटीच करुणा त्या समाधींजवळ वसली होती.विचारात रंगली होती. तिने शेवटी त्या समाधींना प्रार्थना केली :

 "पवित्र आत्म्यांनो, प्रेमळ आत्म्यांनो ! मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल, कधी कंटाळल्ये नसेन, कर्तव्यात टंगळमंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटवा. शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की जा, करुणा रडत आहे. तिला जाऊन भेट. पवित्र आत्म्यांनो, ह्या मुलीची ही प्रार्थना पुरी करा.”

 समाधीना फुले वाहून ती घरी आली. ती अंथरुणावर पडली. शांत झोपली. जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल ह्या विश्वासाने ती झोपली होती. आज तिला लवकर जाग आली नाही. किती तरी दिवसात अशी शांत झोप तिला लागली नव्हती. आणि पहाटे पहाटे स्वप्न पडले. सासूसासरे शिरीषला हाताला धरून आणीत आहेत, असे तिने पाहिले. ती लाजली आणि स्वप्न भंगले. प्रेमात गलेले स्वप्न भंगले. परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात ?


करुणादेवी.djvu
४८ * करुणा देवी