पान:करुणादेवी.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतील. हेमा, तू दूर जाऊ नयेस असे ज्याप्रमाणे तुझ्या आईबापांस वाटते, तसे मी दूर जाऊ नये म्हणून माझ्या आईबापांस नसेल का वाटत ? तू तुझ्या आईबापांची एकटी, तसा मीही माझ्या आईबापांचा एकुलता. तू काही कर. परंतु पित्याकडून राजाला गळ घालच. माझी प्रधानकी रद्द करव. मला मुक्त कर. मी येथे कैदी आहे, दुःखी आहे.”

 “ परंतु सासूबाईंना व मामंजींना इकडे का नाही आणीत ?”

 “ तिकडे माझे मित्र आहेत. प्रेमानंद आहे. आणि.....”

 “ आणि कोण ?”

 “ असे पुष्कळ मित्र आहेत. नको विचारू.”

 “ मी विचारीन हो बाबांना.”

 “ विचार ”

 दोघे परतली. गाडीत बसून आपल्या निवासस्थानी आली. भोजन झाले आणि हेमा रात्री माहेरी गेली.

 “ बाबा, शिरीष दुःखी आहेत.”

 “ कोणते दुःख ?”

 “ ही प्रधानकी नको असे त्यांना वाटते. त्यांना खेड्यात जाऊन राहावे असे वाटते. त्याचे वृद्ध आईबाप तिकडे आहेत. ”

 “ त्यांना इकडे का नाही आणीत ?”

 “ काही अडचणी आहेत. ”

 “ कोणत्या ?"

 “ त्या ते सांगत नाहीत. ”

 “ हेमा, तुलासुद्धा येथून जावे असे वाटते का ?”

 “ शिरीषचे सुख ते माझे येथून जाण्याने त्यांना सुख होत असेल, तर मोही जाईन. मी गेलेच पाहिजे. ”

 “ मला सोडून जाणार?”

 “ बाबा, नदी पर्वताला व सागराला दोघांना कशी सुखवू शकेल? नदी सागराकडेच जावयाची. त्यातच तिची पूर्णता. ती डोंगराजवळ राहील तर तिचे जीवन होईलं का विशाल ?”

३० * करुणा देवी