पान:करुणादेवी.djvu/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 “ तुम्हाला माहीत आहे. मी जाते. मैत्रिणी शोधीत येतील. आज रात्री जा हा दीपोत्सव पाहायला. आमच्या घराजवळही या. आमच्या घरावरही आज शेकडो, हजारो दीप लागतील. तुम्ही तुमच्या हृदयातही लावा. माझ्या घराजवळ तरी लावा. लावाल ना ?”

 "बघेन. ?"

 "मी जाते."

 ती गेली. शिरीष तेथेच होता. रात्र झाली. आकाशात लाखो दीप लागले, आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते. वसतिगृहातील विद्यार्थी दीप-शोभा पाहाण्यासाठी हिंडत होते. आसपासच्या खेडेगावांतून हजारो स्त्रीपुरुष आले होते. मुकापूर राजधानीने हजारो हिरेमाणकांच्या माळाच जणू काय गळ्यात घातल्या होत्या. सुंदर प्रसन्न देखावा !

 हेमा आपल्या प्रासादाच्या पायच्यावर उभी होती. ती अलंकारांनी नटलेली होती. जणू देवतेप्रमाणे तेथे ती दिसत होतं. गर्दी येत जात होती. हेमा कोणाची वाट पाहात होती ?

 ती पाहा शिरीष आला. हा पाहा एक दिवा विझला. हेमा दिवा लावू लागली. परंतु दिवा लागेना. तिने शिरीषकडे पाहिले.

 “ शिरोष, ये. आपण दिवा लावू. ”

 “ दे, मी लावतो.”

 “ शिरोषने दिवा लावला व तो जाऊ लागला.

 “ शिरीष, दिवा विझू नको हो देऊ. राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत, परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विझू नये....." ती म्हणाली.

करुणादेवी.djvu
२८ * करुणा देवी