पान:करुणादेवी.djvu/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 “ खुळ्या बायकोला तू कशाला उद्या नेशील? खरे ना हो, प्रेमानंद ? प्रधान झाल्यावर शिरीष मला नेईल का ?”

 “ नेईल. त्याने न नेले तर तुम्ही जा.”

 “ त्याने घालवले तर ?”

 “ राजाजवळ दाद मागा.”

 “ पतिपत्नीची ताटातूट करणारा राजा न्याय थोडाच देईल ?”

 “ करुणे, राजा यशोधर थोर आहे. पुण्यश्लोक राजाला नावे नको ठेवूस.”

 “ प्रेमानंद, मी तर आता जाईन. माझ्या वृद्ध आईबापांची तू काळजी घे. करुणा आहेच. ती त्यांचा सांभाळ करील.परंतु तुझेही लक्ष असू दे. तुम्ही दोघे आहात. म्हणून मला चिंता नाही. करुणे, त्या उगवत्या सूर्यनारायणास साक्षी ठेवून शपथ घे, की सासूसासऱ्यांची मी सेवा करीन.”

 “ शिरीष, शपथ रे कशाला? तुझा शब्द मला वेदवाक्य. आणि मी कधी तरी त्यांची अवज्ञा केली आहे का ?”

  “ तरीही शपथ घे.”

 “ घेते हो. ‘उगवत्या सूर्यनारायणा, तू जसा कधी उगवायचा चुकत नाहीस, त्याप्रमाणे मी सासूसासऱ्यांची सेवा करायला कधी चुकणार नाही. तुझी शपथ. जर मी शपथभ्रष्ट झाल्ये तर तू माझे भस्म कर !' झाले ना शिरीष समाधान ? ”

 इतक्यात घोडेस्वार आले. शिरीष करुणेसह घरी आला. प्रेमानंद बरोबर होता.आईबाप रडू लागली.

 “ आई, नको रडू. बाबा रडू नका. करुणा तुमची काळजी घेईल. सारे मंगल होईल.” शिरीष म्हणाला.

 “ बाळ, पुन्हा कधी रे भेटशील ? कधी दिसशील ?” माता म्हणाली

 “ सुखदेव, सावित्रीबाई रडू नका.शिरीष मोठा होईल. प्रधान होईल. आपल्या गावाचे नाव होईल. शिरीष, प्रधान झाल्यावर गावाला विसरू नकोस हो !” शेजारी म्हणाले.

 “ नाही विसरणार. माझ्या आईबापांना सांभाळा, करुणेला मदत करा. ” तो म्हणाला.

१८ * करुणा देवी