पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'काही झालं तरी तिच्या नातवाची आई होणार तू आता. आणि इथं मी कामाला गेल्यावर तू एकटीच असतेस. तिकडे तुला जरा सोबतही होईल.'
 शेवटी तिनं 'हो' म्हटलं. श्रीपतीचं म्हणणंही बरोबरच होतं. श्रीपतीची आई आणि आत्या चडफडत का होईना तिचे डोहाळे पुरवत होत्या. तिच्या इच्छा अपुऱ्या राह्यल्या तर मूल वेडंवाकडं जन्मायचं म्हणून सगळ्या इच्छा पुऱ्या होत होत्या- मग ती देवळात जाण्याची असो किंवा एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची, त्यांना भागच पडायचं ते. आणि राधेचं लक्ष नाही असं वाटून त्या बाया जेव्हा तिच्याकडं बघून बोटं मोडायच्या तेव्हा तर तिला फारच गंमत वाटायची.
 श्रीपती एकदा मध्येच घाईगडबडीने येऊन 'तिच्याकडं लक्ष द्या.' म्हणून आईला सांगून गेला. आणि तो गेल्यागेल्या इकडे राधेच्या सासूचा तळतळाट सुरू झाला. 'लक्ष द्ये म्हनं. कुनाला सांगतुयास तू काय करायचं ते. हिची काळजी घ्येऊ? मंग आतापातुर हिच्या कामाबिगर दुसरं काय केलंया का म्या?'
 'राधा स्वत:शीच हसली. इतके दिवस कस्पटासारखं वागवलं गेल्याचा हा तिचा सूडच होता.
 जेव्हा नऊ महिने उलटले तेव्हा सासूनं विचारलं, 'तू मोजल्येस ना बरूबर?'
 'हां.'
 'हां आता काई बायांना लागत्यात नऊ महिने आन् नऊ दिस.'
 'आन त्यातनं पह्यलंच हाये. लागतो येखादीला उशीर' श्रीपतीची आत्या म्हणाली, काही दिवसांनी परत श्रीपतीच्या आईनं विचारलं, 'अग तू निच्चीत बरूबर मोजल्ये हायेस ना?'
 'व्हय वं. पौषात पाळी चुकली-'
 बऱ्याच वेळा मोजती गिनती झाल्यावर राधाला कबूल करायला लागलं की दहावा महिना संपत आलाय. मग सुईणीला बोलावलं गेलं. तिनं राधाचं पोट चार ठिकाणी चाचपलं आणि म्हणाली, 'येळ हाये अजून.'
 नजर लागू नाही म्हणून राधा पहिल्यांदा आपल्याला जपायची. पण आता तिचं ओटीपोट जवळपासच्या लोकांच्या कुत्सित नजरांचा, टोमण्यांचा विषय बनला. पहिल्यापहिल्यांदा सगळे म्हणत की तिचं पोट इतकं मोठं झालं म्हणजे तिला मुलगाच होणार. पण आता ती जवळ आली की बायांची

कमळाची पानं । ६९