पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोटारी, मग माणसं. शेवटी एक वळण घेतलं न् समोर कावेरीचा उगम. एक लहानसं सिमेंटकाँक्रीटने बंदिस्त केलेलं कुंड. तिथं फुलं वाहणारी भाविक चेहऱ्याची माणसं. जिनं डोंगराच्या सुळक्यावरून नाट्यमय उडी फेकावी ती ह्या खळग्यातून बुडबुडत कशी निघेल?
 कुंडाशी बसून एक दागिन्यांनी लगडलेली, हिरवं नेसलेली नववधू पूजा करीत होती. पूजा करता करता, काही अंतरावर तिच्या नवऱ्याने धरलेल्या कॅमेऱ्याच्या डोळ्यात पाहून हसत होती. वर्षांनुवर्षांनी ते फोटो कौतुकाने दाखवीत तो तिला म्हणणार आहे, "आठवतं तुला?"
 माझ्याकडे फोटो नाहीत. तिनं तिच्या भ्रमंतीत देश पालथा घातला, पण ती कधी कॅमेरा घेऊन प्रवासाला जायची नाही. चिडून म्हणायची, "ह्या कॅमेरावाल्यांना कॅमेऱ्यातून जगाकडे पाहायची इतकी सवय होते की ते स्वत:च्या डोळ्यांतून जग पाहायलाच विसरतात!" पण स्वत:च्या डोळ्यांतून पाहिलेलं विसरलं तर? 'विसरलं तर विसरलं', ती म्हणाली असती. जे आपसुख आठवणीत राहील ते खरं.
 मग मी इथे आठवणी मुद्दाम उकरून काढायला कशाला आले? ही बोच दुखवणं काट्याची बोच दुखण्यासारखं अर्धवट सुखद नसतं.
 कुंडाभोवतालच्या गजबजाटापासून जरा लांबच आम्ही बसलो. माझ्या धापा थांबल्या होत्या. माझ्या कानांत घुमणारा त्यांचा आवाज बंद होऊन भोवतालची शांतता ऐकायला यायला लागली होती.
 वसू म्हणाली, "आई, असलाच का कावेरीचा उगम?"
 "नाही गं, खरा उगम पलीकडे कडा दिसतो ना, त्यातून असणार. हे आपलं पूजेपुरतं."
 नेहमी वापरात नसलेलं सगळं ज्या अडगळीच्या खोलीत आपण टाकून देतो, तिथं वर्षानुवर्ष पडून राहिलेले शब्द योग्य संदर्भ मिळाल्याबरोबर उसळी मारून माझ्या जिभेवर आले होते. अगदी हेच मी तिला विचारलं होतं नि हेच उत्तर तिनं दिलं होतं.
 मला तिचा राग आला. का स्वत:च्या शरीराने मर्यादित केलेल्या सूक्ष्म विश्वात बंदिस्त होऊन राहत नाही माणूस? तो स्वत:चा विस्तार करतो, आपण वाढलो की आपलं सुख वाढेल ह्या कल्पनेनं. पण तो वाढवीत असतो ती वेदनेची शक्यता. फक्त स्वत:च्याच नव्हे, इतरांच्यासुद्धा- जे त्याच्या कौतुकाने वाढवलेल्या पसाऱ्याच्या आत सामावतात त्यांच्या. काय अधिकार

कमळाची पानं । ४३