पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही? त्यातून तुझी प्रकृती ही अशी असताना तर नाहीच नाही."
 मी सरळ उत्तर दिलंच नाही. म्हणाले, "तुला हवं असलं तर तू नि वसू मोटारने जा. मी पायी येणार आहे."
 मग अर्थातच आम्ही पायी निघालो. माधवचं एक चांगलं आहे. रागावला म्हणजे सरळसरळ रागावणार, रागावून झालं म्हणजे सोडून देणार. 'उगीच तुझ्या हट्टामुळे माझे बघ कसे हाल होताहेत!' असा मार्टरचा आव आणणार नाही. अर्थात हाल होत असले तर माझेच होत होते, पण कधीकधी स्वत: हाल सहन करण्यापेक्षा दुसऱ्याचे बघणं जास्त कठीण असतं हीही गोष्ट खरी.
 त्या वेळी तिचा पाय पडलेल्या ठिकाणी आता माझा पाय पडेल कदाचित, अशी एक कल्पना मी माधवला बोलून दाखवली नाही. तो लगेच 'स्टॅटिस्टिकल प्रॉबेबिलिटी' वगैरे काढून त्या गोष्टीची अशक्यता मला पटवून द्यायला लागला असता. कदाचित ती मला पटलीही असती. म्हणूनच मी त्याला काही बोलले नाही. काही कल्पना तर्कशास्त्राच्या कसाला न लावणंच शहाणपणाचं असतं.
 पण ही जंगलातली पाऊलवाट. झाडासारखं झाड. काही ओळखीचं वाटत नव्हतं. आणि वाट तरी तीच असेल कशावरून? नदीच्या प्रवाहासारखी तीही बदलणार. शिवाय त्या वेळची माती पावसाने, वाऱ्याने, आता धुपून गेलेली असणार. खरं म्हणजे सगळंच बदललं होतं किंवा मला आठवत तरी नव्हतं. मरकारा तसं लहानसंच गाव. पण आम्ही उतरलो होतो ते घर, वरखाली जाणारे रस्ते-काही म्हटल्या काही ओळखत नव्हतं. डोळे बांधून एकदम मला कुणी इथे आणून सोडलं असतं तर कधी न पाहिलेल्या ठिकाणी आले आहे असंच वाटलं असतं.
 मागे आलो होतो तेव्हा आठवड्याच्या बाजारातून जंगलातल्या कुरुबांनी गोळा करून आणलेला बाटल्याच्या बाटल्या मध विकत आणून इडल्यांबरोबर फस्त करीत होतो, बाकी सगळी तोंडीलावणी तिखट लागायची म्हणून. कुरुंजीच्या फुलांच्या वासाचा मध. काल दोनतीन दुकानांत विचारून पाहिलं. कुरुंजीच्या वासाचा मध? हे टूरिस्ट लोक नादिष्टच असतात. काहीच्या काहीच मागतात... दुकानदारांनी माना हलवल्या.
 ह्या जंगलातून आम्ही चालत होतो, तेव्हा घेतलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर कुरुंजीच्या वासाने नाकपुड्या भरून जात होत्या. नाकाने वास घेतला की जिभेवर मधाचा वास रेंगाळायचा. आता कितीही श्वास ओढला तरी तो वास येत नव्हता. कुरुंजीची सगळी झाडंच तोडली की काय कुणी? शेवटी डोंगर

कमळाची पानं । ४१