म्हणाली, "झालं ते झालं. तू धीर सोडू नको. बरी होशील तू ह्यातनं." अनुजा फक्त क्षीणपणे हसली.
ती मेली तेव्हा रणजित तिच्या जवळ होता. डॉक्टर त्याला म्हणाले, "सगळं संपलंय रणजितभाऊ. पुढची तयारी करा."
"काही तरी काय सांगताय डॉक्टर? ही काय चांगली जिवंत आहे. बघतेय माझ्याकडे." आपला हात तिच्या डोक्यावर ठेवून तो हलक्या आवाजात तिच्याशी काहीबाही बोलत राहिला.
डॉक्टरांनी त्याच्या भावाला निरोप पाठवला. त्यांनी येऊन रणजितला घरी नेलं. अनुजाच्या भावाला पैसे देऊन अंत्यविधी उरकायला सांगितलं. रणजितनं अंत्यविधीला जायला मागितलं नाही. मागितलं असतं तरी दादांनी त्याला पाठवलं नसतं.
दादा-वहिनी त्याला कशाबद्दल काही बोलले नाहीत. त्याचं सांत्वनही केलं नाही. त्यांना वाटलं काही दिवस गेले की तो रुळावर येईल. मग त्याचं लग्न करून देऊ. सगळं काही सुरळित होईल. हे मधले दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखे विसरून जाऊ.
पण रणजित दारूची संगत सोडायला तयार नव्हता. तो बाहेर जायचा आपल्या पायानी पण बहुतेक वेळा जवळजवळ बेशुद्धीत त्याला कुणीतरी घरी आणून सोडायचं. भावाचं रागावणं, वहिनीचं समजावणं कशानंच काही फरक पडला नाही. शेवटी लिव्हरच्या दुखण्याने त्याला हॉस्पिटलमध्ये टाकलं, त्यातून तो वाचू शकला नाही.
अनुजाची आई म्हणाली. "माझ्या सोन्यासारख्या पोरीला त्यानं मारून टाकली, त्याची काही तरी शिक्षा त्याला मिळायला हवीच होती." तिचं म्हणणं बरोबर होतं.
रणजितची वहिनी म्हणाली, "आमचे भावोजी किती चांगले होते हो. त्या पोरीनं त्यांना भुरळ घातली न् त्यांचं सारं आयुष्य नासवलं."
तिचंही बरोबर होतं.
अंतर्नाद मार्च २००७