पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. सॉरी, मावशी."
 "नाही, एवढ्यावर संपलं नाहीये." रागिणी म्हणाली. "विक्रम, तुला वाटतं तितकी नाही तरी थोडी मूर्ख आहेच मी, आणि मतलबीही. पत्र आजच आलं हे खरं आहे. पण ते सहज दिसेलसं न ठेवता मुद्दाम मासिकाखाली मी लपवून ठेवलं हेही खरं आहे. तुम्ही आल्या आल्या ते तुमच्या नजरेला पडायला नको होतं मला."
 "का?" विक्रम म्हणाला.
 "कारण तिचं पत्र हातात पडलं की तुम्हांला दुसरं काही सुचत नाही. जेवणावर सुद्धा लक्ष नसतं तुमचं."
 "मग त्यात काय बिघडलं? तुला तिचा मत्सर वाटतो?"
 "हो, वाटतो. जिच्यावर तुमची इतकी भक्ती आहे तिनं तुमच्यासाठी काय केलंय? कधी चांगलंचुंगलं करून खायला घातलंय? तुमच्या अंगावर धड कपडा आहे की नाही बघितलंय? कधी तुमच्यापाशी बसून काही शिकवलंय? वाचून दाखवलंय? कधी खेळलीय ती तुमच्याबरोबर? तुम्ही जेमतेम कळण्याइतपत मोठी होता तेव्हा तुम्हांला घरात कोंडून ठेवून ती तासन्-तास बाहेर जायची. तुम्हांला भीती वाटेल, काही अपघात होईल ह्याचीही कदर करायची नाही. आई म्हणवून घेण्याचा अधिकार ज्यामुळे पोचावा अशी एक तरी गोष्ट तिनं केलीय?"
 विक्रम म्हणाला, "तसं सर्वमान्य चाकोरीबद्ध निकष लावून पाहिलं तर तिने आमच्यासाठी काही केलं नाही हे कबूल केलं पाहिजे."
 त्याच्या नुसत्याच मिशी फुटलेल्या ओठांवर तुच्छतादर्शक स्मित होतं.
 धरम काकुळतीने म्हणाला. "रागिणी. जाऊ दे ना. कशाला तु हा वाद काढत्येयस?"
 "कधी तरी काढायला हवाच होता धरम. तू आता मला रोखू नको. सर्वमान्य चाकोरीबद्ध कल्पनांप्रमाणे आईनं मुलांसाठी जे जे करायला हवं, जे सगळं मी ह्यांच्यासाठी करत आले. ते निरर्थक, नगण्य आहे का?"
 शमा म्हणाली, "योग्य भूमिकेतून केलं तर नगण्य नाहीच."
 "मग मी अयोग्य भूमिकेतून केलं असं तुला म्हणायचंय का?"
 "तसंच नाही."
 "चाचरतेस कशाला? सरळ बोल की," विक्रम म्हणाला. "जी योग्य भूमिकेतून करीत असेल तिला ते बोलून दाखवायची गरज भासणार नाही. ती

कमळाची पानं । १२३