त्याच्या बदल्यात कृतज्ञतेची अपेक्षा करणार नाही, कारण ती जे करते ते तिला त्यातून काही तरी मिळतं म्हणून करते."
"तुमच्यासाठी मी जे काही केलं असेल त्यातून मला काय मिळालं?"
"तुला मूल हवं होतं आणि तुझी ती कधी न भागलेली भूक तू आमच्याकरवी शमवीत होतीस."
इतका दुष्टपणा! रागिणीला दु:खापेक्षा आश्चर्य जास्त वाटलं. ती म्हणाली, "म्हणजे क्रांतीनं अणि तुम्ही माझ्यावर उपकार केलेत."
"नाही. उपकार कुणीच कुणावर केले नाहीत. प्रत्येकानं आपल्याला जे करणं भाग होतं ते केलं, एवढंच."
"क्रांतीनं जे केलं ते करणं तिला भाग होतं हे मला नाही पटत."
"काही गरजा परिस्थितीजन्य असतात, काही स्वभावजन्य. तिनं केलं ते करणं तिला दोन्ही कारणांसाठी भाग होतं. आपल्या देशात आज जी परिस्थिती आहे ती सहन करून जगत राहणं तिला शक्य नव्हतं."
"पण म्हणून अगदी लहान वयात तुम्हांला वाऱ्यावर सोडून देणं समर्थनीय होतं? तुमच्याबद्दल तिची काहीच जबाबदारी नव्हती?"
"अर्थातच होती. त्यामुळेच तिला असं वाटलं, की आहे ह्या वातावरणात मुलांना वाढवणं योग्य नाही. ते बदलण्यासाठी धडपड केली पाहिजे." रागिणीकडे पाहात विक्रम एकदम त्वेषाने म्हणाला, "तुला असं वाटतं का, आम्हाला सोडताना तिला काहीच यातना झाल्या नसतील? तिनं जे केलं त्याला असामान्य धैर्य लागलं असलं पाहिजे."
"पण तिचं हे असामान्य धैर्य अनाठायीच होतं. त्याचा उपयोग झाला? आज दहा वर्षांहून जास्त काळ ती नि तिच्या सारखे कैक खितपत पडलेत. त्यांची आयुष्ये बरबाद झाली- पण त्यामुळे परिस्थितीत काही बदल झालाय का?"
"तो मुद्दा नाही,' विक्रम म्हणाला. "फरक कधीतरी पडेल. कदाचित खूप दिवस पडणारही नाही. पण त्याचा अर्थ आहे ही परिस्थिती मुकाट्याने स्वीकारायची असा होत नाही. त्याविरुद्ध लढलंच पाहिजे. परिस्थिती बदलेपर्यंत लढा दिलाच पाहिजे."
"त्याची काहीही किंमत द्यावी लागली तरी?"
"अर्थात. ती किंमत माझ्या आईसारखे काहीजण मोजायला तयार असतात म्हणून इतरांचं भवितव्य बदलण्याची काही तरी शक्यता आहे. सगळेचजण
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/124
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १२४
