पान:कथाली.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या कानांचं त्या कानाला कळलं तर तुमची बी हीच गत हुईल, ध्यानात ठिवा. सापाने मंत्र फुकलेल्या बेडकीसारख्या त्या एक जागी खिळून नवऱ्याचे बोलणे ऐकत राहिल्या.
 सावित्राच्या अचेतन देहाला नाहू माखू घालतांना त्यांना रडू आवरेना. सावित्राची पाठवणी केली आणि त्यांना भडभडून उलटी झाली. पोटातलं सारं पाणी पडून गेलं. निपचित पडल्या पडल्या त्यांना वाटलं होतं. मरण वाईट खरंच. पण मरत मरत जगण्यापरीस सावित्रा सुटली... मोकळी झाली.
 आज दहा वर्षांनंतर सावित्राच्या कोवळ्या कुंवार आवाजातला आकांत त्यांना पुन्हा ऐकू येऊ लागला. वैनी मला वाचीव गऽऽ, मला जगायचंय, मला मरायचं न्हाई. मला भीती वाटते. मी चुकलेऽऽऽ. पाहता पाहता त्या किंकाळ्यांची जागा बेबीच्या निग्रही, स्थिर आवाजानं घेतली.
 आबा, मी निर्णय घेतलाय. धनंजय स्वतःच्या कर्तृत्वावर जगणारा स्वाभिमानी तरुण आहे. आम्ही दोघे इंजिनिअर आहोत. मी त्याची जात पाहिली नाही. पण त्याच्या घरातलं सहजसुंदर खेळीमेळीचं वातावरण, त्याची आई, बहीण आणि त्याचे बाबा यांच्या दिलखुलास चर्चा, वादावादी. मी धनूपेक्षा त्या घरात जास्त गुंतले. तरीही आबासाहेबांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. तो मला सन्मानाने मागणी घालायला आला असताना माझा निर्णय मी बोलणार नाही. आयुष्यभर माझ्या गरीबड्या आईला मुक्या अणूंच्या डोहात सडवलीत. सावूआत्या कशानी म्येली हे साऱ्यांना माहिताय. मला मारण्याची हिंमत असेल तर तेही करा. सगळ्यांना मारून कुणासाठी जगणार आहात आबा? कुणासाठी जगणार आहात?
 वर्षानुवर्ष असलेली खिडकी झंझावाताने उघडी व्हावी नि मोकळ्या हवेचा; निरभ्र प्रकाशाचा झोत लक्कन आत यावा, तशा त्या मनातल्या मनात भानावर आल्यासारख्या ओरडल्या, "न्हाई, हा बळी मी घिऊ द्याची न्हाई" हा तिसरा बळी मी घेऊन देणार नाही.
 माधवरावांनी गुप्तीवरची पकड घट्ट केली. क्षणाचाही विलंब न लावता गुप्तीचे धारदार पाते उचकून बाहेर काढले आणि धनंजयाच्या दिशेने ते झेपावले. त्याचा वार धनंजयाच्या अंगावर पडण्यापूर्वीच बेबीने आपले अंग त्यांच्यावर ढालीसारखे झोकून दिले. आणि तिच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करून दै.सत्यवार्ताचा

स्फोट / ५७