पान:कथाली.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो. कधी तरी स्फोट होणारच. त्याची बायकोच गुप्तीने नवऱ्याच्या पाठीवर सपासप वार करते. हे आवश्यकच आहे.
 स्त्रियांना आत्मभान आले पाहिजे. त्या निर्भय झाल्या पाहिजेत. भाभींचा 'मनस्विनी' प्रकल्प हे काम गेली अनेक वर्षे निष्ठेने, समर्पक वृत्तीने करीत आहे. या कामातूनच लेखिकेला साहित्य निर्मितीचे रॉ मटेरिअल मिळाले असावे.
 काही कथा पांढरपेशा जीवनातील स्त्रियांचे भावविश्व चित्रित करतात. उदा. 'स्कूटरचोर मुलगी' 'झ्शा', 'मैत्र' मध्ये एक समाज सेवेस वाहून घेतलेली तरुणी 'मीनू' तिचा मित्र असाच सेवेस वाहून घेतलेला सदू यांचे भावविश्व नाजूकपणे चित्रित झाले आहे. कथेच्या शेवटातून या कथेचा रोख कळतो. संवादात्मकता आणि ग्रामीण भाषेतून वातावरणनिर्मिती केल्याने कथेतील ग्रामीण वास्तव डोळ्यासमोर उभे राहते. मारवाडी - राजस्थानी भाषेचा वापरही अशाच कौशल्याने झाला आहे. 'गेंदलासु गोद भराओ जी बन्ना' या कथेतही याचा प्रत्यय येतो. गीताने रंजकता वाढली आहे.
 डॉ. सौ. शैला (भाभी) लोहिया या समाजसेवेस वाहून घेतलेल्या, सुविद्य, संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांच्या व्यापक, सहानुभूतीपूर्ण अवलोकनातून दिसलेले समाजदर्शन त्या समर्थपणे आपल्या साहित्यातून घडवितात. हा कथासंग्रह त्याची बोलकी साक्ष आहे.
 यंदाच्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कथा हा गौण वाङ्मय प्रकार आहे' या विषयावर परिसंवाद झाला. तो किती व्यर्थ, अनावश्यक होता याचे प्रत्यंतर जी. ए. ते भाभीपर्यंतच्या कथाकारांच्या कथा देत आहेत. मराठी साहित्यांचे दालन अनेक नामवंत कथाकारांनी समृद्ध केले. जागतिक वाङ्मयात कथेला मानाचे स्थान आहे.
 प्राचार्या डॉ. सौ. शैला (भाभी) लोहिया यांना माझ्या पुढील साहित्य प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा. रा. द. अरगडे

चार / कथाली