पान:कथाली.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खाली भस्माची पांढरी रेघ. मी सुट्टीत घरी आली की जिजी घरी येई. माताजींना तिचे येणे मुळीच रुचत नसे. ती घरी गेली की तिच्या माघारी कूरकूर करीत. उठवळ झालीय. तरणे पुरुष असोत की म्हातारे ही वचावचा बोलते. आजकाल तर काहीही घडायला लागलेय. तिची गाऱ्हाणी त्या मला सांगत.
 "गुडिया, तुझ्या बाबूजींनी माझा घुंगट काढून टाकला तर केवढी रडले मी. माहेरी भावजयांनी... तुझ्या मामीजींना कमी का टोमणे मारले? घुंगट असताना चार घरी जाता येई. घुंगट निघाला आणि उघड्या तोंडाने रस्त्याने कशी जाऊ या लाजेनं बाहेर जाणंही सोडलं मी..."
 तुझ्या वयाची होते तेव्हा मनहर झाला होता मला.
 ...तुमच्या बाबूजीचे लाड उद्या भोवणारेत मला. त्या विधवेच्या नादी नको लागूस बाई इत्यादी अनेक... आमचे बाबूजी छलकनशी फारसे बोलत नसले, तरी त्यांच्या मनात तिच्याविषयी सहानुभूती नक्की असावी. माताजी अशी टकटक करू लागल्या की ते हसत आणि म्हणत, "तुझी माँ निव्वळ भोळी आहे. तिला धास्ती वाटते त्या पोरीची. बिचारी नकळत्या वयातच विधवा झाली. आज हसाया बागडायचं वय आहे तिचं. विधवा झाली त्यात तिचा काय दोष? आपल्या राधाशी... गुडियाशी चार शब्द बोलल्याने तिला आनंद मिळत असेल तर मिळू द्यावा तो आनंद..."
 छलकन् माझ्याकडे आली की मनहरभैया मात्र आमच्या आसपासच कुठेतरी असे. देवदास, नौका डुबी, कफन, गोदान, श्रीकांत असली पुस्तकं नेमकी तिला दिसतील अशी ठेवी. अर्थात ती नेमकी पुस्तकं छल्लोजिजी वाचायला हमखास घेऊन जाई. भैया 'लॉ'च्या पहिल्या वर्षाला होता तेव्हाची गोष्ट आदल्या दिवशी तिने शरदबाबूंची श्रीकांत कादंबरी वाचायला नेली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपार विलक्षण तापलेली असायची. अशाच एका तापलेल्या दुपारी बाहेर गलका ऐकू आला. मधली काकी रडतभेकत घरात आली आणि सांगू लागली, "छल्लोनं बावडीत उडी घेतलीय. बाहेर येत नाही म्हणतेय, सगळा मोहल्ला जमा झालाय..."
 मी आणि मनहरभैया धावतच विहिरीकडे गेलो. खोल विहिरीत गळाभर पाण्यात छलकन् उभी होती. धन्नोकाकाने गळ खाली सोडला होता. तिला तो गळाला पकडून वर ये म्हणून विनवीत होता. पण ठेचलेल्या अंगाने पाण्यात उभी

गेंदलासु गोद भराओ जी बन्ना / २७