पान:कथाली.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "यावा यावा की...ह्येंनी सांगितलंवतं की आपल्याच जातीची येक पोरगी शेजारच्या साळंत जाती म्हणून. आन् लई शिकल्याली हाय. चौदावी की पंधरावीत हाय. दिसायाबी देखणी हाय. तूच नव्हं ग? आमचा दीर आणि आमचे साहेब दोघेच. सासुसासरे मरून झाली धा वरसं. रमेसभाऊ म्यॅट्रिकनंतर दोन वरिसं कॉलिजात होते. विंजिनेर का काय हाईत. पुण्यात नोकरी हाये. लहानपणी लई चांगलेवते. आता कंदी कंदी बाटली... बाईने जीभ चावली आणि काहीशा उत्साहाने म्हणाली, "लई काम असलं की त्ये बी औषधच असतं म्हने!" आता तुमी शिकलेल्या. तुमाले माहीतच हाये", असे म्हणत तिने कोचावर बसण्याचा आग्रह केला.
 भामाताईंनी आग्राहाने चहा, पोहे खायला घातले मगच निरुपमांची सुटका झाली होती...
 "निरू, असोल्या मुगाची खिचडी केलीय. मटाराचे दाणे घातलेत. तुला आवडते अशी खिचडी. खाऊन घे माय थोडी अन् मंगच झोप. उठ माज्या लेकरा." अती मायेनं नलूताईंनी निरूला उठवून जवळ घेतले. आईच्या कुशीत घुसून निरू ढसढसून रडू लागली.
 "आई, एवढी बोलघेवडी नि भांडखोर तू. म्हशीसाठी, जगूच्या मार्कासाठी, कुंपणाच्या फूटभर जागेसाठी शेजाऱ्यांशी खनखना भांडणारी तू. माझ्या लग्नाच्या वेळी का नाही नवरा, त्याच्या घरची माणसं पारखून आलीस? अण्णांना दारू पाजली की ते खूश. त्यांना भैयाजींनी खूश ठेवलं. महिना पंधरा दिवसांत माझी गाठ त्या नरपड्या माणसाशी बांधून टाकलीस. तू पयल्यांदा त्याला पाहिलंस की अनूताईजवळ बोलली होतीस म्हणं. पोरगं भलतंच वीक आहे. चेहऱ्यांवर तेज नाही. मला अनूताईने नंतर भलतंच वीक आहे. चेहऱ्यावर तेज नाही. मला अनूताईने नंतर सांगितलं. भाराभर भांडी दिलीस. भला सोन्याचं गंठन दिलंस. भैयाजी नि भामावैनींना दोन शेवंत्या चढविल्यास. का तर हुंडा मागितला नाही. पाप्याच्या पितराशी मजं लगीन लावून मोकळी झालीस. पण झालीस का मोकळी? बोल. तुझा पण जीव जळतो गऽ. मला कळतंय. पण काय करूं मी? आई मला एकेक श्वास जड जातोय ग. आई मला मारून तरी टाक गऽऽ." निरुपमाचा आवाज वाढला. दुकानातून आलेल्या नवीनला तो. ऐकू आला असावा. तो घाईने घरात शिरला. माठातून तांब्याभर पाणी आणलं.

१४ /कथाली