पान:ओळख (Olakh).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाभारताची कोणतीही प्रत घेतली तरी शैली आणि कथानक दोन्ही दृष्टींनी कर्णाच्या उदात्ततेला अनुकूल, प्रतिकूल जाणारे मुद्दे महाभारतात आहेत इतकाच याचा अर्थ आहे. सोयीस्कर धरसोड केल्याशिवाय कर्णाचे केवळ उदात्त चित्र कोणत्याच भारतीय प्रतीच्या आधारे रेखाटता येणार नाही असाही याचा अर्थ आहे. पण विजय देशमख कर्णाच्या प्रेमात सापडलेले आहेत आणि प्रेमात एकदा माणूस पडला म्हणजे तो कशावर विश्वास ठेवील याला सीमा नसते. तसे विजय देशमुखांचे झाले आहे. कर्णपर्वाच्या शेवटी त्या पर्वाची स्तुती आहे. या स्तुतीत असे म्हटले आहे की हे कर्णपर्व जो वाचतो त्याला सर्व तीर्थयात्रांचे पूण्य मिळते. सर्व प्रकारच्या दानधर्माचे फळ मिळते. भक्तिपूर्वक कर्णाचे आख्यान वाचले म्हणजे धर्म, अर्थ, मोक्ष व काम सफल होतात. कणंपर्वाबाबत असल्याप्रकारची स्तुती असणे व या पर्वाचे फल सांगणे याला काही अर्थ आहे असे देशमुख गृहीत धरतात. त्यांना असे सुचवायचे आहे की कर्णाच्या आत्मबलिदानामुळे हे पर्व व्यासांना पुण्यमय झाल्यासारखे वाटते. वस्तुस्थिती अशी आहे की अशाप्रकारची फलश्रुती भारतातील अनेक पर्वांना आहे. उद्योगपर्व वाचणारांना असेच विविध प्रकारचे पुण्य मिळते. शिवाय दीर्घ आयुरारोग्य प्राप्ती होते. स्त्रीपर्व वाचणारांना त्यांची पापे संपतात. ब्रह्महत्येचे पाप जाते. पुत्रपौत्रादिकांचे सुख मिळते. असल्या प्रकारच्या फलश्रुती धार्मिक ग्रंथांना असतातच. सर्व महाभारत हाच आमच्या संस्कृतीचा पूज्य ग्रंथ आहे. महाभारत हे चविध मोक्षसाध्य करणारे असे आख्यान असल्यामुळे व प्रामुख्याने ते मोक्षशास्त्र असल्यामुळे संपूर्ण महाभारताची फलश्रुती आहे. ती अनेकदा आहे. वेगवेगळ्या पर्वांची स्वतंत्र पारायणे करण्याची प्रथा असल्यामळे निरनिराळ्या पर्वांनासुद्धा फलश्रुती आहेत. अशीच एक फलश्रुती कर्णपर्वालाही आहे. यापेक्षा या फलश्रतीला जास्त अर्थ नाही. देशमुख कुठे काय पाहतील याचा नेम नाही. भीम कर्णाला मल्लयुद्धासाठी पाचारण करतो. कर्ण हे नाकारतो. देशमखांनी ' विश्वामित्र धनर्वेद ' या ग्रंथातील उतारा देऊन असे म्हटले आहे की मल्लयद्ध हा युद्धाचा कनिष्ठ प्रकार आहे. स्वतः कर्ण मल्लयुद्धात पटाईत होता, त्याने जरासंधा.शी या प्रकारचे यद्ध केले होते हे ते विसरूनच जातात

 कर्णाच्या मृत्यकडे आत्मसमर्पण आणि बलिदान या दृष्टीने पाहावे या त्यांच्या प्रतिपादनाशी माझा काही विरोध नाही. पण या प्रतिपादनामळे जे इतिहास आणि संस्कृतीचे प्रश्न निर्माण होतात ते आपण समजून घेतले पाहिजेत. इतिहासाच्या दृष्टीने पाहायचे तर चिकित्सक आवृत्ती जे प्रक्षिप्त म्हणून सोडून देते ती सगळी इ. स. १००० नंतरची भर आहे. यातील म्हणजे चिकित्सक आवत्तीतील इसवीसनोत्तर आणि भगकूलाने केलेला प्रक्षेप सोडून

५०

ओळख