पान:ओळख (Olakh).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही असे त्यांना वाटते. सुंदर स्त्रीचे आकर्षणच इतके मोठे असते की तिच्या ठिकाणी कोणताही दुर्गुण असेल अशी कल्पनाच आपल्याला करवत नाही, असे जर कुणी म्हटले तर कोल्हटकर त्याला लंपट म्हणतील.
 कोल्हटकरांच्या नाटकांवर असा एक आक्षेप आहे की, त्यांचे खलनायक भित्रे व मुर्ख असतात. ज्यांच्या दुष्टतेची भीती वाटावी, चिता वाटावी तीच माणसे हास्यास्पद व फार गंभीरपणे घेण्याजोगी नाहीत असे प्रेक्षकांना वाटू लागले तर फारच रसभंग होतो. हे कोल्हटकरांच्या नाटकात नेहमी होते. अशी रचना कोल्हटकर जाणीवपूर्वक करतात. ह्या रचनेचे ते समर्थनही करतात. त्यांचे म्हणणे असे की, खलनायक भित्रा असणे प्रेक्षकांना सद्गणी करण्यासाठी आवश्यक आहे. आणि दुर्गणांचा पाडाव व्हावा ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मूर्ख ठेवणेही आवश्यक आहे. शेक्सपीयरची सर्व नाटके एका झटक्यात सद्गुण प्रसाराला अडथळा आणणारी ठरविणारा हा निकष आहे. कोल्हटकर खलनायक नेहमी शकारच असला पाहिजे असे मानतात की काय कोण जाणे.
 करंदीकरांनी कोल्हटकरांच्या नाटकावर किर्लोस्करांच्या सुखांतिकेचा किती गाढ परिणाम अंतरंगाच्या दृष्टीने आहे ह्याकडे अतिशय मार्मिकपणे लक्ष वेधले आहे. त्यामुळे नाटककार म्हणून त्यांचा विचार करताना स्तुतीला पुष्कळच मुरड घालावी लागेल पण किर्लोस्कर व कोल्हटकर ह्यांच्यातील एक फरकही महत्त्वाचा आहे. तो करंदीकरांनी नोंदविलेला नसला तरी महत्त्वाचा आहे. किर्लोस्कर पुराणांमधील अनेक कथांना अगदी कौटुंबिक व वास्तववादी रूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोल्हटकर वास्तव समस्यांना स्वप्नांत नेऊन सोपी उत्तरे देत आहेत हे विसरता येत नाही. किर्लोस्कर फार मोठे व्यासंगी पंडित नसतील पण त्यांना वाङमयात भावनेचे महत्त्व कळते. कोल्हटकर भावनेचे फारसे महत्त्व ललित वाङमयातही मानावयास तयार नाहीत हेही चितंनीय म्हटले पाहिजे.

 श्रीपाद कृष्णांना कविता, नाटक हे वाङमय प्रकार फारसे यशस्वी रीतीने हाताळता आलेले नाहीत. त्यांच्या सामर्थ्याचा प्रकर्ष जाणवतो तो विनोदी लिखाणात. करंदीकर सांगतात, ललित वाङमयाच्या विविध प्रकारांत त्यांच्या व्यासंगाला वाव नव्हता. विनोदी निबंधात त्यांच्या व्यासंगाला मोकळे रान होते. समीक्षेत त्यांच्या कल्पकतेला वाव नव्हता, विनोदात तो होता म्हणून त्यांचा विनोद यशस्वी झालेला आहे. करंदीकरांच्या विधानाला मी अजून एक जोड देऊ इच्छितो. कोल्हटकरांना भावनेचे फारसे आकर्षण नव्हते. त्यांना उत्कट प्रसंग जमतच नव्हते. विनोदात ह्या भावनात्मक पातळीची गरज नव्हती हेही तेथील यशाचे एक कारण म्हटले पाहिजे.

ओळख

१११