पान:ओळख (Olakh).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पाटणकरांसारख्या सूक्ष्म विचारवंत असल्या प्रकारची विस्कळीत भूमिका घेईल हे संभवतच नाही. म्हणून अशी भूमिका त्यांनी घेतलेली नाही. पण यापेक्षा निराळी भूमिका घ्यायची म्हटले तर अडचणी उभ्या राहतात. आपल्या सिद्धांतासाठी आधार म्हणून जी विधाने घ्यावयची ती फक्त कलाकृतीच्या संदर्भातच निष्पन्न झाली पाहिजेत आणि कलाकृतींना कलाकृती म्हणून सामोरे जाणा-या आस्वादकांच्या प्रतिक्रियांतून ही विधाने निष्पन्न झाली पाहिजेत. शिवाय हा आस्वादक पूर्वग्रहदूषित ठरीव कल्पना आस्वादावर लादणारा नसावा. त्याच्या प्रतिक्रिया उस्फूर्त असाव्यात. कलाकृतीच्या आस्वादव्यापारात ज्या संकल्पना उस्फूर्तपणे उदयाला येतील त्यांची संगती आणि विश्लेषण पाटणकरांनी आपला आधार मानलेला आहे. हा आधार पुरेसा खात्रीचा नाही. आपणासमोर प्रतिक्रियांचे ग्रथन करणारी फक्त विधाने असतात. ही विधाने खरोखरच आस्वादकांची उत्स्फूर्त विधाने आहेत की नाहीत हे सांगता येणे कठीण जाते. आणि मग आपण ज्या पद्धतीने आजतागायत कलामीमांसक चर्चा करीत आले त्याचे गट पाडू लागतो, आणि सर्वच गटांच्या विवेचनात काही तरी सत्यांश असलाच पाहिजे या गृहीत भूमिकेवर सर्व गटांना समावेशक अशी मीमांसा बांधू लागतो.

कलामीमांसेच्या बाबतीत हा नेहमीच जटिल प्रश्न राहिलेला आहे
ओळख

९३