Jump to content

पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


वाशिम जिल्हा

सरपंच परिवर्तनाचे दूत बनतील... 

  वाशिम जिल्हा हा विदर्भातून नव्याने निर्माण झालेला जिल्हा. मुलींची कमी होणारी संख्या आणि शेतक-यांची आत्महत्या या दोन प्रश्नांसाठी हा जिल्हा ओळखला जातो. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत या जिल्ह्यात झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गजाभाऊ अमदाबादकर म्हणाले, "शेतकरी आणि स्त्रीया हे दोन घटक गुणाकार करणारे घटक आहेत. म्हणजेच एक बी पेरल्यानंतर हजारो दान्यांचे कणीस आणि धान्य शेतकरी निर्माण करतो तर स्वत: जेवलेले अन्नाचे पोषण वापरुन स्त्री मरणाची कळ काढून माणसाला जन्म देते. या दोन घटकांचा न्याय केल्यासच ख-या अर्थाने विकास साधला जाईल." कार्यक्रमाचे उद्घाटन पाळण्यात छोटी मुलगी घालून तिच्या जन्माचे स्वागत करुन मा. गणेश पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अॅड. वर्षा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्यपूर्ण रितीने करण्यात आले.
 कारंजालाड या वाशिम जिल्ह्यातील ४८ सरपंच आणि सरपंच संघटनेचे प्रमुख पांडुरंग हिंगणकर यांनी गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि मुलींची कमी होणारी संख्या हा विषय पूर्ण दिवस कार्यशाळेला हजर राहून समजून घेतला. ‘सरपंच हे केवळ राजकारणासाठी असणारे पद नसून ते परिवर्तनाचे दूत बनू शकतात' असे मत सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री पांडूरंग हिंगणकर यांनी व्यक्त केले. महिला सरपंचांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा गिरीगोसावी या उपस्थित होत्या. सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे तसेच पंचायत समिती सदस्यांसाठी या विषयाची अशी कार्यशाळा झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी मी पुढाकार घेईन असे गिरीगोसावी म्हणाल्या. मेहकर व रिसोड हे दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मुलींची संख्या वाढताना दिसत आहे. २०२१ पर्यंत शेतक-यांची आत्महत्या व मुलींची कमी होणारी संख्या हे दोनही कलंक दूर करण्याचा निर्धार आशाताई पासून ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान समन्वयकांपर्यंत सर्वांनी व्यक्त केला.
 ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळे सरपंच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेत सक्रीय झाले.