पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक भान हरवलेला गणेशोत्सव

 गोध्राच्या जातीय, धार्मिक दंगलीनंतर येणारा हा गणेशोत्सव! लोकमान्य टिळकांनी १८९४ साली जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हाही अशाच दंगलीची पार्श्वभूमी त्यामागे होती. लोकमान्य टिळक उत्सवांना राष्ट्रोन्नतीचे साधन मानत. निरनिराळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र यावेत व त्यातून राष्ट्रैक्य साधावे अशी त्यांची इच्छा होती. त्या वेळच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे असत, तशीच व्याख्यानेही होत. अनेक व्याख्यानांचे अध्यक्षस्थान मुस्लीम बांधवांकडे असायचे. उत्सव आजच्याप्रमाणे दहा दिवस चालायचा. उत्सवामागे लोकमान्यांची विशिष्ट अशी भूमिका होती.
 लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा अनेक सुधारकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते, आरोप केले होते. उत्सव सुरू होऊन दोन वर्षे उलटल्यावर या आक्षेपांना उत्तर देताना टिळकांनी स्पष्ट केले होते की, या दहा दिवसात विद्यार्थ्यांच्या मनावर जे संस्कार होतील ते शाळेतील वर्षाच्या शिक्षणाहून अधिक किमतीचे खास आहेत. अशा उत्सवांचे वेळी उत्पन्न झालेल्या धर्मबुद्धीचाच सर्व आयुष्यभर उपयोग व्हायचा असतो. उदात्त विचार व उच्च मनोवृत्ती याचवेळी जागृत होतात. ज्यामुळे जिवंत राहण्यात एक प्रकारचा थोरपणा आहे. त्या गोष्टी शिकण्याच्या शाळा हे उत्सव आहेत. शाळेतील शिक्षण संसारातील वस्तुस्थितीशी झोंबाझोंबी करण्यात फारच थोडक्या वेळा उपयोगी पडते. या विचारांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे आजचे रूप पाहिले की ते उत्सवामागचं सामाजिक, शैक्षणिक भान हरवून बसलेत हे प्रकर्षाने लक्षात येतं.

 सार्वजनिक उत्सव हे समूहजीवनाचे वस्तुपाठ बनायला हवेत. त्यातून नागरी जीवनाची शिस्त अंगी बाणायला हवी. अशा उत्सवांचे सामाजिक

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७२