पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लेखापरीक्षण (सोशल ऑडिट) व्हायला हवे. केवळ आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण आकड्यात अडकून रहाते. ते अनिवार्य असले तरी उत्सवांचा सामाजिक जमा खर्च अधिक महत्वाचा मानला गेला पाहिजे. त्यासाठी सर्व थरावरील यंत्रणा कार्यक्षम अंमलबजावणीबाबत दक्ष हव्यात. उत्सव साजरे करणारे मंडळ असते. बहुधा त्यात तरुणांचा भरणा अधिक असतो. तारुण्यातील काही तरी करून दाखवण्याची सळसळ त्यामागे असते. साहजिकच भव्य, दिव्य, भपकेबाज, क्षणिक प्रभावी कार्य नि कार्यक्रमावर भर असतो.
 उत्साहाच्या भरात मंडळ स्थापन होते. आधी उत्सव मग मंडळाची नोंदणी असा क्रम होतो. तो उलटा व्हायला हवा. नोंदणीकृत मंडळांनाच उत्सव साजरे करण्याची परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले तर सध्याचा गणेशोत्सव अनेकांगांनी समाज हितैषी बनवणे शक्य आहे. केवळ पोलीस स्टेशनकडे अर्ज केला की गणेशोत्सवाला परवानगी असे होऊ नये. मंडळ स्थापनेसाठीची वैधानिक तरतूद आहे. सार्वजनिक धर्मादाय आयुक्तालयाचे रीतसर नोंदणीपत्र आवश्यकच नाही तर अनिवार्य (सक्तीचे) करावे. त्यामुळे ‘पाणी अडवा पाणी जिरवा'च्या धर्तीवर ‘रस्ता अडवा गणपती बसवा' च्या वृत्तीस पायबंद करणे शक्य होईल. त्यातून तरुणांना जबाबदारीचे भान येईल.
 नोंदणीकृत मंडळांनाच वर्गणी गोळा करायचा अधिकार हवा. त्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे राबवणे शक्य आहे. त्यामुळे खंडणी पद्धतीची वर्गणी वसुली नियंत्रित करता येईल. गणेशोत्सव मंडळांनी स्वेच्छा नियोजनाची पद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. जमलेल्या निधीच्या वापर, विनिमयासाठी अंदाजपत्रक करणे गरजेचे आहे. जमलेल्या निधीच्या विनियोग व नियोजनात मंगलमूर्तीचा खर्च, सभा-मंडप, रोषणाई, ध्वनिवर्धक, स्वागत मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, दैनिक पूजा खर्च इतक्याच बाबींचा विचार होतो. त्याशिवाय अशा निधीतून चिरस्थायी सामाजिक उपक्रम चालविण्यावर भर द्यायला हवा. जमलेल्या वर्गणीचा मोठा हिस्सा सामाजिक, शैक्षणिक कार्यावर खर्च व्हायला हवा. लोकमान्य टिळकांनी जे उत्सव सुरू केले त्यामागे हे भान होते. ते विसरून चालणार नाही. उत्सव, उत्साह, आतषबाजी, रोषणाई, सजावट, मिरवणूक या सर्वामागे आनंदाचं उधाण आहे. पण त्यातून काही निर्माण होणार नसेल, हाती काही राहात नसेल तर सारे व्यर्थ. अनेक प्रकारे गणेशोत्सव मंडळांना सामाजिक कार्य करता येणे सहज शक्य आहे.

 आपले मंडळ ज्या परिसरात कार्य करते त्या परिसराचा मंडळांनी अभ्यास करायला हवा. आपल्या परिसराचे सामाजिक, शैक्षणिक प्रश्न कोणते आहेत, ते या सार्वजनिक निधीतून व समूह जीवनाच्या वस्तुपाठातून कसे दूर करता

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७३