पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंदिस्त करणे म्हणजे आपला विकास अवरुद्ध करणे असते, हे तरुणाईला जितके उमगले आहे तितके ते समाज नेतृत्वास नाही; हे वास्तव नाकारता येणार नाही.
 स्वतंत्र भारताने लोकशाही, प्रजासत्ताक, पंचायत राज्य इ. संकल्पना घटनात्मक चौकटीतून स्वीकारून ज्या सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेचे स्वप्न रंगवले होते ते प्रजासत्ताक सुवर्णमहोत्सव साजरे करताना (२000) आपण प्राप्त करू न शकल्याचे शल्य ‘प्रजासत्ताक संबंधी पूर्वचिंतन व मशागत अशा दोन लेखांत व्यक्त केले आहे. यातील विचार अंगिकारून जर आपण राजशकट चालवला तर पदरी काही सामाजिक न्याय पडेल. अन्यथा, स्वप्नभंगाचे दुःखच उरी, जिव्हारी राहील.
 भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपण समाजातील निम्न वर्ग व जाती। विकासाचे धोरण अंगीकारून अनेक कल्याण योजना राबवल्या. त्यातून प्रत्येकाचा भौतिक विकास झाला. जीवनमान उंचावले, पण कार्यसंस्कृतीचा विकास न झाल्याने आपणास समाज, अर्थ, राजकारण, संस्कृती इ. क्षेत्रात अपेक्षित यश आले नाही. भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, विधिनिषेधास तिलांजली यामुळे जपान आपला आदर्श न राहता आपण लिबियाचे अनुगामी झालो. 'Work is worship', जे माझं नाही, ते घेणार नाही, ‘आराम हराम है, ‘पाट्या टाकणं म्हणजे फसवणूक' अशी छोटी वाक्यं, सुभाषितं आपला जोवर आचारधर्म बनणार नाही, तोवर आपण देशात बदल घडवू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट सरकारने करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडणारा समाज; सवलती, माफी, नादारीग्रस्त माणसं हे सामाजिक अस्वास्थ्याचे लक्षण खरे! पण सतत तोच तो मार्ग आपण चोखाळू तर बाहेर केव्हा पडणार? स्वावलंबन, स्वाभिमान, स्वत्व या गोष्टी कळतील तो सुदिन, हे कार्यसंस्कृतीवरील लेखातून पुरेसे स्पष्ट होईल.
 पैसा परमेश्वर मानणाच्या समाजाचा कांचनमृगच होणार ना? घरोघरी जर माणसांपेक्षा यंत्रं अधिक असतील, यंत्रंच माणसास नाचवत राहतील. मग घरास घरपण कसे रहाणार? यंत्रघर माणूसघर बनायचं तर ‘भावना' आणि ‘भौतिकतेचे तारतम्य आपण शिकायलाच हवे. यंत्राधीन होऊन आपले चालणे संपणे, मातीचे नाते संपणे यातूनच तर घरोघरी असंवादाची स्थिती निर्माण झाली आहे. पंखा, टी.व्ही., वीज, फोन, गॅस, गिझर सतत चालू ठेवणारी घरं निसर्गसिद्ध जीवन जगूच शकणार नाहीत. पर्यावरणविषयक जागृती, कृतिशीलता, पावलापुरता प्रकाश मानून जोवर आपण आचरणार नाही तोवर नळाला पाणी येणारच नाही. पाणी वाचवणे म्हणजे निर्माण