पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपत्ती व निर्णय अशा तिन्ही गोष्टी गतीने आल्याने समाजरचनेत तिची भूमिका निर्णायक बनली. मूल्यांपेक्षा किंमत, भावनेपेक्षा भौतिक, नात्यापेक्षा व्यवहार, शिक्षणापेक्षा शहाणपण, समूहापेक्षा व्यक्ती आणि विचारापेक्षा कृती महत्त्वाची ठरल्याने घर, समाज, व्यक्ती धारणेत आमूलाग्र बदल झाले. मनुष्य टोकाचा आत्मरत व आत्मकेंद्री झाला. समाजकारणाची जागा राजकारणाने घेतली. सेलिब्रेटी व सत्तधीश समाजाचे ‘आयडॉल' बनले. यात किंगमेकरची भूमिका मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बजावली. परिणामी ‘कमॉडिटी बेस सोसायटी' नावाची एक नवी अर्थसंरचना उभी राहिली. चेन मार्केटिंग, आयपीएलशरण समाज यामुळे फसवाफसवी हा सार्वत्रिक व सार्वजनिक उद्योग झाला. 'चिअर्स गर्ल्स'ची आवश्यकता समाजास डोपिंगसारखी उत्तेजक वाटू लागली. अभिनेत्री लिलावी झाली व बोलीही बोलू लागली. विधिनिषेध ही व्यक्तिगत बाब बनली.
 यामुळे कार्ल मार्क्स व त्याचे तत्त्वज्ञान कुचकामी ठरले. त्यात या तत्त्वाज्ञानावर उभारलेले संघर्ष, संघटना यांनी काळाची पावले ओळखून बदल न स्वीकारल्यामुळे जगातील अनेक कम्युनिस्ट राजवटींचा पाडाव झाला. मजूर वर्ग मध्यमवर्ग बनल्याने त्याच्या मुठी ढिल्या झाल्या. कार्ल मार्क्सचा १00 वा स्मृतिदिन सन १९८३ मध्ये साजरा होत असताना लिहिलेला या संग्रहातील पहिला लेख 'सामाजिक बदलाचे माक्र्सचे स्वप्न आज तीन दशके उलटल्यानंतर वाचताना लक्षात येते की विचार व आचारांमध्ये अंतर पडले की तत्त्वज्ञान निष्प्रभ होते. म्हणून तत्त्वाचा आग्रह धरताना कालभान ज्यांनी जपले ते काही परिवर्तन करू शकले. 'महापुरे वृक्षे जाती, तिथे लव्हाळे वाचती' हा लवचिकतेचा सामाजिक व्यवहार मूळ निसर्ग नियम आहे, हे आपण ध्यानी घेतले पाहिजे. गांधीवाद, समाजवाद इ. विचारधारांचेही हेच झाले, हे या संदर्भात आपण लक्षात घ्यायला हवे.
 म्हणून राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.आंबेडकरांचे विचारही वर्तमान बदलाशी ताडत आचरायला हवेत. राजर्षी शाहू महाराजांनी त्या वेळी विविध जाती, धर्माची काढलेली वसतिगृहे वर्तमानातही जर आपण एकजातीयच ठेवण्याचा आग्रह धरू तर तो जातीय अभिनिवेश ठरेल. अॅड. प्रकाश आंबेडकरांचा जात, धर्म उल्लेख टाळण्याचा विचार हा सामाजिक परिवर्तन पुरोगामी बनवणारा विचार ठरतो, ते वर्तमान समाज स्थितीतील स्थित्यंतरामुळे. जग एक होत असताना जात, धर्म, राष्ट्र, नागरिकत्व, संस्कृती, भाषा गौण ठरून मानव अधिकार, जात-धर्मनिरपेक्षता, वंचित विकास या गोष्टींना आपसूक महत्त्व येते. टाळकुट्या पद्धतीने विचार