पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(Horsepower) मोजता येत नाही. ते अपरिमित असतं. म्हणून कर्मठशील मनुष्य बळाचा देश म्हणून जपान, जर्मनी, इस्त्रायलकडे पाहिलं जातं. २) अर्थकेंद्री- यांना हिशोबीही म्हणता येईल. या प्रकारच्या माणसांचं काम हे सारं पैशाच्या हिशोबात असतं. मेहनतीपेक्षा मोबदला मोजणारे, मिळवणारे हे लोक. त्यांच्या मनात आपली कोणीतरी पिळवणूक करतंय असा समज घर करून बसलेला असतो. सतत अशांत. त्यांना कितीही, काहीही द्या. त्यांचं समाधान होत नाहीच मुळी. व्यवस्था खिळखिळी करणारे, पोखरणाच्या वाळवीसारखे असतात हे लोक. ३) आळशी- आराम हे असतं या मंडळींचं जीवनमूल्य, कामचोर, कामात टाळाटाळ, पाट्या टाकणारी ही मंडळी कामाचा खोखो खेळण्यात प्रवीण असतात. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या म्हणत ते आपल्या कामाचं बाळ (भार) दुसन्यास दत्तक देण्यात पटाईत असतात. भारतात पहिल्या वर्गगटाचं मनुष्यबळ कर्मठ, क्रियाशील मनुष्यबळ अल्पमतात तर अन्य दोन (अर्थकेंद्री व आरामशीर) बहुमतात असं जे चित्र आहे तो आपल्यापुढील खरा यक्षप्रश्न होय. अर्थकेंद्री व आरामशीर काम करणाच्या बहुसंख्य भारतीयांना कार्यसाधक बनवण्याचे आव्हान भारतीय कार्यसंस्कृती पुढे आऽ वासून उभं आहे!
 सामान्य व्यक्ती आपला परिचय देऊन आपली ओळख करून देतात. अलीकडे व्हिजिटिंग कार्डचं वाढतं प्रस्थ हा देश कार्यबलाच्या (Work Force) संदर्भात साधारण देश असल्याचंच सुचवतो. कार्यकर्त्यांची ओळख आपणास त्याच्या कामातून होत असते. आत्मपरिचय गुण व कार्यातून व्हायला हवा. तीच आत्मविकासाची खूण असते. आत्माविष्काराची क्षमता ही आत्मविकासातून होत असते. आपण आपल्यातील सुप्त गुणांचा सतत शोध घेत ते विकसित करायला हवेत. त्यासाठी गरज असते सततच्या आत्मसंवादाची. मग त्यातून येतं आत्मस्फुरण. आपल्यात सकारात्मक, सर्जनात्मक, निर्मितीक्षम वर्तन-परिवर्तन घडून यायचं असेल तर आत्मस्फूरण जिवंत रहायला हवं. आपल्या मनातील कार्यकस्तुरीचं संजीवन आपण कधी अनुभवत नाही, हे मोठं दुःख आहे. आपल्यात कृतिशीलतेचे अमृतघट ओथंबून भरलेले असताना उगीच आपण जगाच्या बाजारी वणवण करतो आहोत. 'अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी?' ही पृच्छा करणाच्या कवीनं दुसरं काय विचारलंय? कस्तुरीमृगाप्रमाणे भारतीयांनी गेल्या पन्नास वर्षात व्यर्थ वणवण केली. आता त्याला आत्मभान यावं!

 तसं झालं तर मग येथील अज्ञान, अनारोग्य, आळस, गरिबी, व्यसनाधीनता दूर होईल. येथील जनसामान्य चरितार्थी, मिळवता, कष्टकरी मेहनती बनेल

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५८