पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. रायबागच्या प्रजाजनांची भलावण आजही किती प्रासंगिक आहे, हे वेगळे सांगायला नको.
 शाहू महाराजांनी प्रजेचे हित अनेक अंगांनी पाहिले. त्यात शेती, पाणीपुरवठा, उद्योग यांचा समावेश आहे. १९०३ ला छत्रपती शाहूंनी व्यापा-यांना त्यांची आर्थिक निकड पाहून थोड्या मुदतीने रोकड देण्याची व्यवस्था केली होती. त्या योजनेच्या जाहीरनाम्यातील अटी पाहिल्या की हा राजा कसा लोकराजा होता याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. इंग्लंडला तेथील राजाच्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने गेल्यावर इंग्लंड व युरोपातील औद्योगिक विकास पाहून आपल्या छोट्या राज्यात छोटा उद्योग तरी सुरू करावा म्हणून सुरू केलेली ‘शाहू मिल' हे त्यांच्यातील द्रष्ट्या राज्यकर्त्यांचे निदर्शक होय. 'How best to utilize the resources of my small pricipality for the good of my people was a question' सारख्या त्यांच्या विचारातून या माणसाचा प्रामाणिकपणाच स्पष्ट होतो. शाहू मिल सारखा ‘उद्योग' सुरू केल्यावर एन्रॉनसारखं टक्केवारीचं वादळ त्या वेळी उठलं नव्हतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.
 शेती विकासाच्या प्रश्नावर शाहू महाराजांनी ८ नोव्हेंबर, १९१७ ला दिलेले भाषण महत्त्वाचे आहे. या वेळी भारतातील ८० टक्के लोक शेतीच्या आधारावर जगायचे. त्या वेळी कोल्हापूर संस्थानची शंभर टक्के प्रजा शेतीवरच अवलंबून होती. आपली प्रजा उत्पादक आहे. मात्र आपल्या शेती उत्पादनाचे विक्री तंत्र तिला माहीत नाही याचं शल्य या राजकत्र्यास होतं. आपल्या शेतक-यांस याचं भान आहे, पण तो असहाय्य असल्याची जाणीव त्यांच्या मनात होती. या जाणिवेतून त्यांनी ‘राधानगरी धरण' उभारलं. तसेच इथे 'व्यापार पेठ' विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीची तुकडेबंदी त्यांनी अमलात आणली. नव्या पिढीत श्रमप्रतिष्ठा जोपासण्याचं त्यांचं स्वप्न होतं.

 अशा कितीतरी उक्ती नि कृतींच्या पाऊलखुणांनी शाहू महाराजांचे जीवन संचित वर्तमानास खुणावत आहे. त्यांच्या विचारांची बैठक ही शुद्ध मानव कल्याणाची व प्रजाहितदक्षतेची होती, त्याची वर्तमानाशी सुसंगती साधणे अवघड असले तरी अशक्य खचितच नाही. प्रश्न आहे तो विचारांच्या प्रतिबद्धतेचा व त्यावरील श्रद्धेचा. गोपाळ कृष्ण गोखले यांनी शाहू महाराजांचा उल्लेख ‘अखिल महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान' असा केला होता. त्या शाहूंचा विचार ‘अखिल महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान' ठरायला हवा. त्यासाठी उत्सवी आतषबाजीपेक्षा समाजजीवन बदलणारे उपक्रम हाती घ्यायला हवेत.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/२५