पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समाजानं माणसाला मृत्युंजयी बनवलं! माणसं मरत नाहीत ही त्या देशाची चिंता. सरासरी वयोमान ८० वर्षे. सारे नेटके करायचा देशाचा रिवाज. पर्यावरण जागृती इतकी की ऑक्टोबरात झिम्मड पाऊस पडत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली सारी झाडे गोणपाटानं लपेटलेली, काही फांद्यांना टेकू दिलेले, का तर झाडांना थंडी वाजून ती मरू नये, त्यांना फ्रेंक्चर होऊ नये! बोला! रस्त्यावरची शंभर वर्षांची शंभर झाडे एका क्षणात कत्तल करणारे आपण व माशाची प्रत्येक जात जगली पाहिजे म्हणून पाण्याच्या तळाचं रक्षण करणारा जपान!
 निसर्ग व माणूस याच्यात अद्वैत निर्माण करून उभयतांचे संरक्षण, संवर्धन करणाच्या जपानकडे शेकडो प्रकल्प, उपक्रम, योजना आहेत. जपानकडे निसर्गसंसाधनांची अद्ययावत सांख्यिकी माहिती आहे. नित्य सर्वेक्षण असते. त्या आधारावर जपान जमीन, जैव वैविध्य, प्रदूषण नियंत्रण करत पर्यटन विकास साधत असतो. तिथे महत्त्वाधारित निसर्ग क्षेत्रे आहेत. संरक्षित क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र इ. पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करताना 'Nature First' या तत्त्वास प्राधान्य असते. तिथे Vacation villeges आहेत. पण पर्यटकांना आखलेल्या मार्गानीच जाणे-येणे करणे बंधनकारक असते. उष्ण पाण्याचे झरे मूळ रूपात जपत माणसे त्याचा अनुभव कसा घेऊ शकतील म्हणून त्यांनी गरम पाण्याची स्नानघरेच निर्माण केली. सामूहिक स्नान हा तिथल्या संस्कृतीचा अभिन्न भाग. नग्न स्नानाचे तिथले महत्त्व सिद्ध करणारे असते. अंघोळ म्हणजे कशी म्हशीसारखी. तासन्तास पाण्यात डुंबून राहणे. आपली अंघोळ असते अंग विसळणे! ते कळायचं तर तिथल्या स्नानगृहात एकदा मनसोक्त अंघोळ करायलाच हवी. समूह भोजनाचं सुख समूह स्नानातही असते असा माझा अनुभव.
हाँगकाँग

 इथे जपानसारखे पर्यावरणाचे नि पर्यटनाचे अद्वैत! ‘डिस्ने वर्ल्ड' हे त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. चीनचा तिथं उभारलेला ग्लोबल जिओ पार्क, मरीन पार्क, 'नेचर नून टच', हा शिक्षण कार्यक्रम, कॅम्प साइटस, पर्वतीय प्रांतातील भ्रमण केंद्रे यातून ते स्पष्ट होते. तिथे दुर्मीळ झाडं नि वनस्पतींची नोंद यासाठी कायदा व यंत्रणा आहे. गेल्याच वर्षी तिथे मी होतो तेव्हा तिथल्या शासनाने निसर्ग संवर्धनाचे नवे धोरण जाहीर केल्याचे वाचनात आले होते. त्यानुसार आशिया खंडासाठी त्यांनी आचार-संहिता तयार केल्याचे माझ्या आजही लक्षात आहे.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५७