पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीच गोष्ट समुद्राची. पाणबुडे, पाणसुरुंग, तेलखाणी, मासेमारी, समुद्रात तेल तवंग तयार करणं इ.तून त्याने जलचरांनाही सोडलं नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या मूल पंचतत्त्वांशी खेळत तोच पंचतत्त्वात विलीन होण्याची वेळ आल्यानंतर मग त्याला पर्यावरण संरक्षण सुविचार सुचू लागला.
निसर्गसंपत्ती : विवेकी वापराची गरज
 प्रगत देशात पर्यावरणास प्रथम धोका निर्माण झाला हे जरी खरे असले तरी पर्यावरण संरक्षणाचा विचारही तिथेच प्रथम जन्माला आला. आज भारतासारखे विकासशील देश या संदर्भात प्राथमिक विचार करताना दिसत असले तरी निसर्गाची अक्षम्य उपेक्षा व विध्वंसन भारतासारख्या गरीब देशात अधिक होते. कारण निसर्ग साधने हे त्याच्या जगण्याचा मूलाधार राहतो. निसर्गातील सर्वच साधने काही वारंवार निर्माण होणारी नसतात. पाणी, सौर ऊर्जा, जंगले यांची झालेली हानी भरून काढता येते पण खनिज संपत्ती एकदा वापरली की परत नाही निर्माण करता येत. सोने, लोह, तांबे, बॉक्साईट, पेट्रोल, गॅस इ. आहे तोपर्यंत तुम्ही वापरू शकाल पण त्याचा अंत ठरलेला आहे. लोह पुढच्या २०० वर्षात संपेल तर सोने आत्ताच संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. जमिनीचेही तसेच. ती निर्माण नाही करता येत. समुद्र इथे हटवला तरी अन्यत्र पसरतो व मग त्सुनामी येते हे माणसाच्या आता लक्षात येऊ लागलं आहे. कोणतीही विकास योजना राबवणे म्हणजे निसर्गाचे विध्वंसन हे ठरलेले. मग महामार्ग करा की विमानतळ तयार करा. तसेच पाणी हे तत्त्व माणसाच्या चैनीला बळी पडलेले पहिले मूलतत्त्व होय. पृथ्वीच्या गर्भातील पाण्याची पातळी जशी कमी झाली तशी पृथ्वीतलावरचीही नदी, नाले, तळी, सरोवरे, विहिरी आटणे म्हणजे संपणेच ना? हे आपण केव्हातरी समजून घेतले पाहिजे.

 भारतातील नद्यांचे प्रदूषण, जंगलतोड, हवेचे प्रदूषण या सर्वामागे विकासाचा हव्यास जसा कारणीभूत आहे, तसे पर्यावरणविषयक जागृतीचा अभाव हेही त्यामागचे मोठे कारण आहे. भारतात पर्यावरण संरक्षण कायदे आहेत पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी जी यंत्रणा लागते तिचा अभाव आहे. राजकीय इच्छाशक्ती नसणे हेही त्याचे आणखी एक कारण होय. आपल्या शिक्षणातून निसर्गसंवर्धन संस्कार व भावसाक्षरता जोवर आपल्यात येणार नाही, तोवर निसर्ग ओरबडणे थांबणार नाही. भारतीय समाजाचे धर्मश्रद्ध मन विज्ञाननिष्ठ बनणे जसे आवश्यक, तसे समाज अंधश्रद्धामुक्त होणेही! नदीप्रदूषण उद्योगापेक्षा धर्म, कर्मकांड, सण इ.तून अधिक होते हे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५१