पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मानवाची निर्मिती 'माकड ते माणूस' या प्रवासात शोधावी लागते. असे असले तरी वनस्पती, प्राणीसृष्टी, वातावरण यांच्यातील परस्पर संबंधातून आजचा माणूस आकाराला आला. तो पूर्वी भटका होता. टोळ्यात राहायचा. जंगल, गुंफा, ही त्याची रहिवास क्षेत्रे होती. पुढे तो शेती करू लागला. प्राणी पाळू लागला. त्यातून गाव, समाज, नगर, गणराज्ये उदयाला आली. स्थलांतर, स्वामित्व इ. तून युद्ध, आक्रमणं सुरू झाली. अस्तित्व संघर्षातून अस्मितेच्या भावनेचा विकास झाला. संस्कृती, धर्म, भाषा विकासातून तत्त्वज्ञान, विज्ञान, यंत्र आकारलं. मनुष्याची सुरुवात निसर्ग मैत्रीतून झाली. पण जीवनाच्या भौतिक सुखलोलुप वृत्तीतून तो निसर्गाशीच लढू लागला. ते त्याच्या उपभोगशील वृत्तीमुळे. माणूस : निसर्गविध्वंसक

 हे सारं कशातून आलं तर मनुष्यद्वारा निसर्गाचा अनिर्बध वापर, भौतिकाचा हव्यास व निसर्गचक्र भेदण्याचा अविवेक. माणसाचं जगणं निसर्गावर अवलंबून आहे, हे माणूस मधल्या काळात विसरला. विशेषतः स्वतःच्या बुद्धी व शोधसामर्थ्याच्या अहंकारातून त्याने विज्ञानक्रांतीच्या जोरावर यंत्रक्रांतीचा विकास केला. त्याने साधे तरफेसारखे छोटे तंत्र काय विकसित केले नि आर्किमिडिज म्हणाला की मी अशी तरफ विकसित करीन की पृथ्वी उचलून दाखवेन. पण नंतरची पिढी आर्किमिडिजचा बाप झाली. तिने उचलण्यावर समाधान न मानता पृथ्वी उलटवण्यातच पुरुषार्थ मानला. साधे खुरप्याने पेरण्यासाठी जमिनीला टोकरणे ही निसर्गचक्र दुखावणे असते, अशा स्थितीत मनुष्य फाळाने नांगरायला लागला. त्याने त्याचे समाधान झाले नाही. त्याने उकरणारा ऑक्टोपस मानले जाणारे जे. सी. बी. यंत्र शोधले. पृथ्वीचा वरचा थर हलवून त्याचे समाधान झाले नाही. त्यानी खाणी खणल्या, सुरुंग लावले व पृथ्वी पोखरायचा सपाटा लावला. अग्नीचे वरदान मिळवताच त्याने जंगलतोड सुरू करून ते खायलाही कमी केले नाही. मूळ शाकाहारी असणारा हा प्राणी जंगलातील वणव्यात भाजलेली जनावरेही रुचकर लागू लागताच त्याला शिकारीची चटक लागली. एक-एक प्राणी-पक्षी-जलचर (मासे इ.) करत त्यांचे वंशच गारद करायला माणसांनी सुरुवात केली. तीच गोष्ट हवेची. कृत्रिम पाऊस, पवनचक्क्या , जंगलतोड, नदी अडवणं, धरणं बांधणं, लेक टॅपिंग, वाफ, धूर, कार्बन, कारखाने, रसायनांच्या नद्या निर्माण करून त्याने नत्रचक्र, पर्जन्यचक्र, ऋतुचक्र भेदायलाही कमी केले नाही. तेल विहिरी बॉम्बनी उद्ध्वस्त करणे, युद्धे, हरितगृहे, महत्त्वाकांक्षी झालेल्या माणसाने अवकाशात शेकडो उपग्रह धाडून तिथे कचरा कुंडी तयार केली.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५०