पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निसर्ग : जग आणि आपण

पृथ्वी : जीवसृष्टी विकास

 विश्वात जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणून पृथ्वीचं असाधारण महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती सूर्यमंडळातून झाली. आंतरतारकीय वायूपासून पृथ्वी तयार झाल्याचं सांगण्यात येतं. पृथ्वी सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. पृथ्वी पूर्वी धुलिकणांचा ढग होता. तो गतिशील होता. तो आपल्या अक्षाभोवती फिरत असायचा. या गतीतून भोवरे निर्माण व्हायचे. त्यातून असमतोल यायचा. भोव-याचे घनीकरण होत गेले. त्यातून हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन ही मूलतत्वे अस्तित्वात आली. त्यांच्या आकर्षण, अपकर्षण क्रियेतून वायू व द्रव्य निर्माण झाले. ते पुढे वेगळे होत गेले. ज्या द्रव्यापासून हा ग्रह घट्ट झाला, ते द्रव्य थंड असावे असा अंदाज आहे. म्हणजे पृथ्वीही पूर्वी सूर्याप्रमाणे तप्त होती. घनीकृत झाल्यावर पृथ्वीत गुरुत्वाकर्षण शक्ती आली. त्यातून उष्णता निर्माण झाली. पुढे कोणत्यातरी क्रियेने पृथ्वी मऊ झाली चिखलासारखी. त्यातून मग पाणी निर्माण झालं. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण गतीने (स्वतःभोवती व सूर्याभोवती) फिरणे इ. तून वातावरणात बदलाचं चक्र सुरू झालं. त्यातून जीवसृष्टीस अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली. समुद्र, पर्वत, खडक, दच्या इ. आकारायला लागले. स्थिर झाले. आम्लयुक्त पावसाने रेणूकणांचे रूपांतर एकपेशीय जीवात (बॅक्टेरिया) झाले. अमीबा निर्माण झाला. पुढे बहुपेशीय प्राणी, वनस्पती निर्माण झाले. त्यांच्या व वातावरणाच्या परस्पर क्रिया सातत्यातून (ऋतुचक्र) निसर्ग निर्माण झाला. वनस्पती, प्राणी, पक्षी, मनुष्य आकारला.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४९