पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आईनं जे समजावलं त्यासारखं उच्च शिक्षण दुसरं नाही. समाजसंबंध मजबूत व्हायचे तर समाजाशी निरंतर संपर्क, सहभाग हवा. अन्यथा तुमचे घर तुटलेले बेट नि तुमची मुले तुसडीच राहणार.
विसंगत व्यवहार
 ‘पालक बोलतात एक नि करतात एक' असं मुले लहानपणापासून पहात असल्याने कळत्या वयात ती विसंगत (Ambivalant) होत जातात. पुढे एक नि मागे एक बोलणे ती ऐकत पाहात असतात. खायचे दात नि दाखवायचे दात त्यांना फारच लवकर लक्षात येतात. या द्विधा वा दुहेरी व्यक्तिमत्त्वामुळे (Duel Personatlity) मुलांची भविष्यात फसगत होते, ती चुकीचं भावविश्व विकसित केल्यामुळे. पालकांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपली मुले कशी होणे अपेक्षित आहे, तसे पहिल्यांदा स्वतः वागायला शिकले पाहिजे. मुलांनी दारू पिऊ नये असे वाटत असेल तर आपण दारूला स्पर्श करता नये. मुलीने सिगारेट पिऊ नये वाटत असेल तर घरी सिगरेट पिली नाही गेली पाहिजे किंवा घरी पिणारे लोक नाही आले पाहिजे. घरात अॅश ट्रे असला की समजायचे इथे काही विसंगती आहे. स्वतः प्रेमविवाह करायचा अन् मुलीने मात्र मी दाखवेल त्याच्याशी लग्न करायचा हट्ट धरायचा. मग ती निसटतेपणी सभ्यतेने विचारतेच, “तुमचा कसा विवाह झाला होता? विसरलात का?" त्याचा राग का यावा?

 मोठ्यांचा आदर ठेवा म्हणण्यापेक्षा घरी आलेल्या मोठ्यांच्या आईबाबा पाया पडतात, तेव्हा मुले आपोआप आई, वडील, शिक्षकांच्या पाया पडू लागतात. माणसास मुळातच संस्कारशील, सभ्य होण्याचे आकर्षण असते. आपण ते किती पल्लवित करतो ते महत्त्वाचे. खोटे न बोलण्याच्या संस्काराची सुरुवात फोनवर खरे बोलण्यापासूनच झाली पाहिजे. घरी असून मोबाईलवर जर तुम्ही 'ट्रॅफिकमध्ये अडकलोय, येतोच' म्हणत असाल तर मुले बागेत राहून शाळेत, क्लासमध्ये असल्याचे सांगणारच. चुकले तरी पालक समजून घेतात, चुका सुधारायची संधी देतात याचा विश्वास निर्माण होईल तर चुकांचा आलेख घसरणार ना? मुलांचं भावविश्व सुसंगत व्हायचं तर आपण सुसंगत वागले, बोलले पाहिजे. 'Seeing Beliving' जसे आहे तसे 'Behaving Truely' ही तितकेच महत्त्वाचे. आडपडदा संस्कृतीची सुरुवात, दारे, खिडक्यांना पडदे लावण्यातून व मोटारीच्या काचांना फिल्म लावण्यातून येत असते हे आपण केव्हा समजून घेणार ?

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३९