पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुटुंब

 कुटुंब अनेक प्रकारची असतात. संयुक्त, विभक्त, दुभंगलेली, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, अपंग, संस्थात्मक इ. कुटुंबावर मुलांचे प्रश्न अवलंबून असतात. प्रश्न गरीब कुटुंबातच असतात हा समज चुकीचा आहे. भरल्या घरातही मूल अनाथ असू शकते. कुटुंब म्हणजे सहजीवन, समूह भोजन, स्नेह, सहवास, सुसंवाद. खच्या कुटुंबात बोलणं, ऐकणं व सहन करणं या तीन गोष्टी असायलाच हव्यात. सर्वांना बोलण्याचा हक्क हवा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेन हॉवर यांची गोष्ट सांगितली जाते. कितीही काम असलं तरी रविवार ते कुटुंबासाठी राखत. दुपारचं जेवण सर्वांनी मिळून घ्यायचा रिवाज होता. जेवणाच्या टेबलावर सर्व सारखे. नातू पण त्यांना Mr. Aisen Houver म्हणून हाक मारायचा आणि कानउघाडणी करायचा. ते चुकलं तर कान धरायचे (स्वतःचा) अमेरिकेत प्रगल्भ लोकशाही का? तर घरात ती प्रगल्भ आहे. लहानांचं ऐकण्याची, दुस-यांचं समजून घ्यायची क्षमता व सहनशक्ती हवी. मुलांना, लहानांना, इतरांना सहन करण्याचा संयम हवा, तरच घर टिकतं. घर म्हणजे नुसत्या भिंती नव्हे. माणसं, संवाद, सहवास, विकास, आपलेपणा, भागीदारी, प्रेम, उबारा, स्वातंत्र्य, समज, सहभाग याची काळजी घ्यायला हवी. घर कसं आहे ते मुलांचा चेहरा सांगतो. तो घराचा आरसा असतो. मुलं अबोल, शांत, एकलकोंडी, अप्पलपोटी, तुसडी, हिंसक, परावलंबी, लाचार, अशिष्ट असणं... कुटुंबाच्या सामाजिक अस्वास्थ्याचे लक्षण असतं. मुलं कशी थुईथुई कारंजी, मोर हवीत, घुबडे नकोत. मुलांसारख्याच मुली हव्यात. कुटुंबात समभाव, समता हवी. लाडके, दोडके फरक नसावा. नकटे, चपटे सर्व आपले असे असेल तर कुटुंब, अन्यथा कोंडवाडा. कुटुंब म्हणजे ओढ. मुलांना केव्हा एकदा घरी जाईन असं वाटतं ते घर. शाळेत जाताना मुलं हिरमुसली होत असतील तर शाळेत काहीतरी कमी आहे समजावं (त्या मुलाच्या दृष्टीने!) मुलांना शाळेचीही ओढ हवी. घर नुसतं साधनांनी भरलेलं नको. त्यात ओलावा, हक्क हवा. साधनं पण भौतिक नको. पुस्तकं, संगणक, इंटरनेट, खेळणी, खाऊ कपडे हवेच पण मुलांच्या आवडी छंदही जपले, जोपासले पाहिजेत. हे मुलांचे घर आहे. आम्ही त्यांच्यासाठी इथं राहतो.' हे पक्कं हवं. जे घर मुलांचं तिथे स्वर्ग, आरोग्य, स्वास्थ्य, आरोग्य शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सांस्कृतिक हरत-हेचं हवं.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२८