पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विशेष मुलांचे प्रश्न
 समाजात मुलांचे प्रश्न म्हणून जेव्हा विचार होतो, तेव्हा प्राधान्याने तो केला जातो सर्वसाधारण (Normal) मुलांचा. पण त्यापेक्षा खरे प्रश्न अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर अशा विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या व प्रत्येक क्षणी जगणं ज्यांच्या पुढे आव्हान असतं अशा मुलांचे (Life challenging and children in special Need). अंध मुलांना सुंदर जग पारखं असतं. पण ते उपजत स्पर्श ज्ञान व अन्य ज्ञानेंद्रियांचा पुरेपूर वापर करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात. स्पर्श व ऐकणं या दोन प्रमुख संवेदनांच्या आधारे ते स्वावलंबी होत असतात. ब्रेल लिपी, जॉज सॉफ्टवेअर, ब्रेल टंकनयंत्र, श्रवण साधने इ. द्वारे ते घेत असलेले ज्ञान, शिक्षण, कौशल्य पाहिले की ब-याचदा डोळसांनाही शरमल्यासारखं होतं. अपंग (Not disable but differently able) मुलांची जिद्द पाहिली की धडधाकट माणसं असलेल्या क्षमतांचा किती कमी वापर करतात ते उमजतं. हात, पाय, बोटं नसलेली मुलं पायानं लिहिताना, रंगवताना पाहिली की अचंबा वाटतो. दोन हात, डोळे, कान, पाय असताना आपण एकच का वापरता असा प्रश्न निर्माण करण्याचं कर्तृत्व ही मुलं करतात. मतिमंद मुलांचं परावलंबन टोकाचं असलं, तरी त्यांचं निरागस हास्य माझं हृदय नित्य गलबलून टाकतं. तीच गोष्ट बहुविकलांग (Cerebral-Palsy) मुलांची. 'मूकं करोति वाचालं, पंगू लंघयते गिरिम' सारखा श्लोक मूक, अपंगांच्या चरम विकासाचा बिंदूच दाखवतो.

 विशेष मुलांचे संगोपन, पुनर्वसन, शिक्षण इ. प्रश्नही विशेष असतात. त्यांचं जगणं, वाढणं, म्हणजे नित्याची अडथळ्याची शर्यत. त्यांना आहार व उपचारही विशेष व नित्य लागतात. विविध परावलंबनामुळे लागणाच्या विविध आधाराचा प्रश्न असतो. संगोपनात सोबत, साहाय्य, साधने इ. मार्गांनी आधार मिळाला तर या मुलांचा विकास होतो. यांच्यासाठी भारतात विशेष शाळा विभक्तपणे चालवल्या जातात. त्या वैज्ञानिक खच्या. ज्या समाजात जसं, ज्यांच्याबरोबर राहायचं तसंच नि त्यांच्याबरोबर शिकायला मिळालं तर अपंगांचं लवकर सामान्यीकरण होतं. पुनर्वसनात नोकरी, व्यवसाय, विवाहाचे प्रश्न व्यक्तिनिहाय भिन्न असतात. तिथंही ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशी या विशेष युवकांची स्थिती असते. अपंगांचं जगणं तर रोज टांगती तलवार. तरी आता समाजाचा संवेदना सूचकांक वाढत निघाल्यानं त्यांचे संगोपन, शिक्षण, पुनर्वसनाचे प्रश्न सुटू लागलेत, सुकर होऊ लागलेत.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२९