पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्यपद्धती, शिक्षण सुविधांत आमूलाग्र बदल व्हायला हवा. दक्षिण महाराष्ट्रात अशा संस्था भौतिकदृष्ट्या संपन्न असल्या तरी आता भावनिकदृष्ट्या समृद्ध व्हायला हव्यात, तर अनाथ बालकांना शिक्षणाची सहज व स्वाभाविक संधी मिळाली असे होईल.

 वंचित बालकांच्या शिक्षणाचा विचार करताना बालगुन्हेगार बालकांच्या शिक्षणाचा विचार अलगपणे अशासाठी करावा लागतो की, या मुलांचं भावविश्व व प्रश्न, मनोदशा अनाथ, निराधार बालकांपेक्षा काहीशी वेगळी असते. अपरिपक्व मुलांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांना बालगुन्हेगारी समजण्यात येते. 'बाल न्याय अधिनियम १९८६' अंतर्गत १२ ते १४ वर्षापर्यंत केलेला अपराध हा अपराधच मानण्यात येत नाही. पुढे झालेल्या अपराधांना पण उदार नि सुधारणेच्या दृष्टीने पाहण्याची तरतूद आहे. चोरी, मारामारी, काळाबाजार, उचलेगिरी, दंगे, छेडछाड इत्यादींमुळे कायदा भंग केल्याने या मुलांना बालगुन्हेगार समजण्यात येते. पूर्वी अशा बालकांना तुरुंगसदृश संस्थांत ठेवले जायचे. आज या संस्था सुधार नि संस्कारकेंद्रे बनल्या असून तेथील प्रशिक्षित अधिकारी, शिक्षक, समाजसेवक, व्यक्तिचिकित्सक यांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांनी अशा बालकांना सन्मार्गी व सुसंस्कारी बनवून सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मुला-मुलींत बाह्य आकर्षणामुळे शिक्षणाविषयी फारशी आस्था दिसत नाही. शिक्षणाचे संस्कारही त्यांना बालवयात मिळालेले नसतात. अशा बालकांत शिक्षणाची गोडी निर्माण करणे हे शिक्षकाचे कौशल्य असते. अशा बालकांना शिक्षण देताना औपचारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण देणे जरुरीचे असते; कारण वय वाढलेल्या मुलांना औपचारिक शिक्षणात रस नसतो. शिवाय आजच्या बेरोजगारीच्या परिस्थितीत केवळ औपचारिक शिक्षण देऊन त्यांचे प्रश्न सुटू शकत नसतात. अशा मुला-मुलींना स्वावलंबन मिळवून देणारे शिक्षण देणे दूरदर्शीपणाचे असते. शिक्षकांनी अशा मुलांना शिक्षण देत असता मैत्री, बंधुता इत्यादी मार्गाने त्यांच्यात आपणाविषयी विश्वास निर्माण करणे जरुरीचे असते. तसे झाले तरच ती शिक्षण, प्रशिक्षणास योग्य तो प्रतिसाद देतात. त्यांचे प्रश्न, समस्या व आवश्यकता समजावून घेऊन त्यांच्या अपेक्षा नि गरजांची पूर्तता करणारे शिक्षण देणे आवश्यक असते. अभिक्षणगृहे, बालगृहे इत्यादींसारख्या संस्थांतील मुले-मुली व कामगार वस्ती, झोपडपट्टया, भटक्यांच्या वसाहती इत्यादींतून येणारी मुले यांना शिकवताना शिक्षकांनी या सामाजिक समस्येचं भान ठेवून अधिक आस्थेने व प्रयत्नपूर्वक शिकवणे गरजेचे आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/६३