पान:इहवादी शासन.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६८ । इहवादी शासन
 

आहे. धर्मांतराने मुक्ति हा खरा गळ आहे. मासा त्याला लागतो." आपल्या मिशनचें मुख्य ध्येय धर्मांतर करून लोकांना ख्रिश्चन समाजांत आणणें हेंच होय असें बुथ यांनी वारंवार सांगितलें आहे. हीं अवतरणें देऊन महात्माजी म्हणतात, "सर्व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतींत हेंच खरें आहे. त्यांची समाजसेवा सेवेसाठी नसून त्या लोकांच्या मुक्तीसाठी आहे. सेवेसाठी मिशनरी भारतांत आले असते तर भारताचा इतिहास निराळाच झाला असता." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ ११३).
 भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्या ख्रिस्तीकरणाच्या कार्याला पायबंद बसेल असें मिशनऱ्यांना वाटलें होतें. पण भारताची निधर्मी राज्याची घोषणा व नेहरूकृत ख्रिश्चन गौरव यांमुळे सर्व रान आपल्याला मोकळें आहे, हें त्यांनी जाणलें व ते चेकाळून गेले. प्रोटेस्टंट मिशनने जाहीर केलें की, "भारत ही लवकरच ख्रिस्तभूमि होईल.' कॅथॉलिक मिशनने घोषणा केली की, "धर्मांतराला ही सुवर्णसंधि आहे. तेव्हा भारताचें तारण करणें आता आपल्या शिरीं आहे." बॅप्टिस्ट मिशनने पुकारा केला की, "अखिल भारताला ख्रिश्चन करण्याची अनन्य संधि आता ख्रिश्चन मिशनऱ्यांना मिळाली आहे." मदुरेचे बिशप जॉन पिटर लिओनार्ड म्हणाले, "भारतीयांच्या ख्रिस्तीकरणाचें कार्य फार मंद गतीने चाललें आहे, हें दुःखदायक आहे. सामुदायिक धर्मांतराचाच आपण अवलंब केला पाहिजे. यासाठी वन्य जमाती व अनुसूचित जाति हे क्षेत्र उत्तम आहे. सर्व मिळून यांची संख्या सात-आठ कोटि आहे." पॉल बेनिश यांचें 'ख्राइस्ट मस्ट रेन' हें पुस्तक १९५३ साली प्रसिद्ध झालें. त्यांत म्हटलें आहे की, "सेंट झेवियर भारतांत आले तेव्हापासून प्रत्येक ख्रिश्चनाने एका हिंदूचें जरी धर्मांतर केलें असतें, तरी आज सर्व भारत ख्रिस्ती झाला असता. अजून प्रत्येक ख्रिश्चनाने हा निश्चय केला तरी भारत हा लवकरच एक कॅथॉलिक देश होईल." (मसुराश्रम, विश्वकल्याणमाला, पुष्प १४, पृष्ठ १३-१९).
 कार्डिनल ग्रेशस एका मुलाखतीत म्हणाले की, "अलीकडे मिशनरी समाज सेवेवर भर देतांना दिसतात. पण आपण हें विसरतां कामा नये की, आपलें खरें उद्दिष्ट ख्रिस्ताचा संदेश पसरून त्याचें साम्राज्य प्रस्थापित करणें हा आहे." (मसुराश्रम- पत्रिका, डिसेंबर १९६९). मिशनरी ख्रिस्तेतर समाजाची सेवा करतात ती मानवता- बुद्धीने नव्हे हें यावरून दिसून येईल. अखिल भारताचें ख्रिस्तीकरण हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट आहे. हिंदु धर्म व इतर सर्व धर्म यांचा उच्छेद हा त्यांचा हेतु यांतून स्पष्ट होतो; शिवाय यामागे राजकीय हेतु असतो हेंहि आता सर्वांच्या ध्यानीं आलें आहे. इतके दिवस ब्रिटिश साम्राज्याचें बळ वाढविणें हा हेतु होता. आता नागालँड, झालखंड असे प्रदेश तोडून काढून भारत दुबळा बनविणें हा आहे. त्या कार्यासाठी त्यांचे परकी पोशिंदे त्यांना धन्यवाद कसे देतात हें वर सांगितलेच आहे.
 इतके दिवस बराच मोठा ख्रिश्चन समाज या ना त्या कारणामुळे त्यांच्या वर्चस्वाखाली होता व त्यांच्या कार्यांत त्यांना साह्यहि करीत असे. आता सुदैवाने