पान:इहवादी शासन.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६६ । इहवादी शासन
 

पैसा मिळतो. नरेंद्रभूषण (चेंगनूर, केरळ) यांना एका फेरीवाल्या ख्रिश्चन गरीब गृहस्थाने या मुलींच्या व्यापारासंबंधी बरीच माहिती दिली. पण माझें नांव कोठे सांगू नका, कारण तसे झाल्यास चर्चचे अधिकारी मला हीं गुपितें फोडल्याबद्दल शिक्षा करतील असें सांगितले. अशा रीतीने युरोपांत नेलेली प्रत्येक मुलगी तेथून निसटून परत येण्याच्या संधीची वाट पाहत असते. इतर मुलींनी फसू नये म्हणून त्या घरीं गुप्तपणें निरोप पाठवितात की, पुन्हा इकडे मुली धाडूं नका.
 रोमन कॅथॉलिक वृत्तपत्रांनी या निंद्य व हीन कृतीचा परामर्श घेतांना पुढील- प्रमाणे विचार प्रकट केले आहेत- (१) 'कन्फेशन्स ऑफ ए नन्' या ग्रंथावर पोपने मागे बंदी घातली होती. हेतु हा की, कॅथॉलिक मठांत जोगिणींना (नन्स) कसें वागविलें जातें, तेथे काय चालतें हे लोकांना कळू नये. केरळ-कन्या प्रकरण त्याच हेतूने चर्चचे अधिकारी दडपून टाकीत नसतील ना? (२) या प्रकरणांत असें अनेकांना वाटतें की, या मुलींना मोलकरणी व रखेल्या म्हणूनच नेले जात असावें. (३) एका मोठ्या पाद्रीसाहेबाने म्हटले आहे की, "युरोपने आतापर्यंत भारतावर जे उपकार केले त्याची परतफेड म्हणून या कन्यकांना पाठविले जात आहे असें मानावें." हे उद्गार अशा मोठ्या पदाधिकाऱ्याला शोभत नाहीत. भारताला जिंकून युरोपने आमच्या धनाची लूट केली, सक्तीने धर्मांतर केलें यासाठीच आम्ही युरोपचं ऋण मानावयाचें काय? कार्डिनलसाहेबांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी दोनदा विचार करावयास हवा होता."
 रोमन कॅथॉलिक पत्रांनी भारताचा अभिमान धरून या दुष्कृत्यावर परखड टीका केली ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पण त्यापेक्षाहि समाधानाची गोष्ट म्हणजे या पत्रांचे संपादक पोपच्या वर्चस्वांतून मुक्त आहेत ही होय. इहवादाच्या दृष्टीने या गोष्टीला फार महत्त्व आहे. मिशनरी व त्यांचे भारतीय अनुयायी हे मात्र पोपचे अंध व हेकट दास आहेत ही गोष्ट या व इतर प्रकरणांतून स्पष्ट होते. असें दास्य पत्करणारा जो ख्रिश्चन समाज हीच इहवादाच्या दृष्टीने फार घातक शक्ति आहे.
 श्री. ग. वि. केतकर यांनी 'ख्रिश्चन देवदासी' या नांवाचा एक लेख लिहून पाश्चात्त्य ख्रिश्चन मठांत जोगिणींना (नन्स) कसें नरकप्राय जीवन जगावें लागतें तें वर्णिलें आहे. रॉबर्ट ब्लेअर कायसर या अमेरिकन लेखकाने तेथील 'लेडीज होम जर्नल' या मासिकांत एप्रिल १९६७ च्या अंकांत मुळांत अमेरिकेतल्या मठांतील जोगिणींची दुरवस्था जाहीरपणे सांगितली आहे. त्या लेखाच्या आधारेच केतकरांनी 'ऑर्गनायझर' (दि. ७-१-१९६८) मध्ये वरील लेख लिहिला आहे. या ख्रिश्चन जोगिणींचें जीवन कैद्यांपेक्षाहि दीन-हीन असतें. त्यांना कसलेंहि स्वातंत्र्य नसतें. अत्यंत स्वल्प चुकांसाठी मदर सुपीरियर त्यांना क्रूर शिक्षा करते. गाणे, नाटक, कुठलीहि करमणूक त्यांना वर्ज्य आहे. सर्व आयुष्य म्हणजे वैराण वाळवंट.