पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२२७

पाहण्याचें सामर्थ्य त्याच्यामध्ये येते. 'सारे विश्व माझें घर' या विश्व- बंधुत्वाच्या कल्पनेंत तो रंगून जातो.

 माणसांमधील देव जागृत करणाऱ्या उदात्त मूल्यांचा जीवनांत आविष्कार हेंच संस्कृतीचे सारसर्वस्व होय. या मानवी संस्कृतीमध्ये इस्लामप्रमाणें प्रत्येक धर्माने मोलाची भर टाकून ती संपन्न केली आहे. या मानवी संस्कृतीचे आपण सर्वजण वारसदार आहोत. सस्कृतीचें उदात्त स्त्ररूप हिंदु मुस्लिमादि सर्व धर्मियांनी समजावून घेतलेँ पाहिजे. वेड्या धर्मभावना व कोत्या कल्पना यांच्या आहारीं न जातां आपण सर्व एकाच कुटुंबांतील आहोत या भावनेनें वागलें पाहिजे. मानवता हे आपल्या सर्वांचें परमोच्च ध्येय आहे हैं ध्यानीं धरून एकमेकांचें जीवन सुखी व उन्नत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज पुनरुज्जीवनाच्या वेदना सुरू आहेत. आपल्या प्रिय व महान् देशाचें भवितव्य घडविलें जात आहे. अशा वेळीं संस्कृतीचे सच्चे उपासक बनणें हें प्रत्येक नागरिकाचें पवित्र कर्तव्यच ठरतें.