पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१५५



लेखणे असा मात्र त्याचा अर्थ करूं नये, इस्लामचा स्वदेशाभिमान हा सर्व जगास लाथाडणारा वेडा स्वदेशाभिमान नाही. त्या स्वदेशाभिमानाच्या पोटी इतर राष्टांविषयीं तुच्छता किंवा वैरभाव नसन आपुलकी व प्रेम आहे. आपल्या राष्ट्राविषयी स्वाभिमान बाळगूनही तो इतर राष्ट्रांबद्दल सहानुभूति दाखवू शकतो; इतर देशांवर प्रेम करू शकतो. ज्याला आंतरराष्ट्रीय स्वदेशाभिमान म्हणतां येईल अशा स्वदेशाभिमानाचा इस्लामनें पुरस्कार केला आहे. मानवतेचे ध्येय इस्लामसमोर असल्यामुळे सर्व जगाविषयी आपुलकी बाळगणे हे त्याचे कर्तव्यच ठरते.

 इस्लामच्या दृष्टीने राज्यशास्त्राचे स्वरूप कसे असते याची रूपरेषा Islam and Socialism' या ग्रंथांत दिसून येते. त्या ग्रंथाचा कर्ता म्हणतो, " मुस्लिमांच्या अमलाखाली सर्व लोकांना सारखे हक्क होते. प्रत्येकावर आपल्या गरीब व अनाथ देशबांधवांचें संरक्षण करण्याची सारखीच जबाबदारी होती. मोफत शिक्षण देण्यांत येई. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उदार आश्रय मिळे. वृद्ध किंवा काम करण्यास असमर्थ असलेल्या अपंग लोकांचा सरकारकडून चरितार्थ चालविण्यांत येई; मुलांचे संगोपन करण्यांत येई आणि लढाईत पतन पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांकरितां व स्त्रियांकरितां फंड उभारण्यांत येई....कोणालाही जास्त पगार देण्यांत येत नसे. सर्वाधिकाऱ्यास किंवा सरकारी नोकरांस मामुली तनखा देण्यांत येई. लोकशाहीच्या सर्वाधिकाऱ्याला कोणताही खास अधिकार ( Power of Veto ) नव्हता. नोकरशाहीचा मागमूसही दिसत नसे....जमिनीवर सरकारची मालकी असे आणि हजरत उमरने जमीनमहसुलाची पद्धत प्रथम जारी केली. वारसाहक्काच्या कायद्या-